सातारा : पुणे-बंगळुरू महामार्गावर वाढे येथे चारचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी झाला. या प्रकरणी चारचाकी चालक सचिन दत्तात्रय मोहिते (रा. सर्जापूर, ता. जावळी, सातारा) याच्यावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून रात्री उशिरापर्यंत त्याला अटक करण्यात आलेली नव्हती.
याबाबत संतोष जालिंदर चव्हाण (वय २४, रा. सावळज सिद्धेवाडी, ता. तासगाव, जि. सांगली) हा युवक त्याच्या दुचाकीवरून (एमएच १० - सीजे ९२७२) सातारहून वाईकडे जात होता. या वेळी सचिन मोहिते समोरून जीप (एमएच ०६ - बीयू ३३६७) भरधाव वेगाने आणि रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून चालवत होता. या वेळी त्याने दुचाकीला जोराची धडक दिली. यात संतोष याच्या डोक्याला आणि डाव्या पायाला गंभीर दुखापत झाली. ही घटना ४ जून रोजी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली असून या प्रकरणी २५ रोजी दुपारी अडीच वाजता सातारा तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार तोरडमल करत आहेत.