शिवडे येथे वाळू उत्खनन करणाऱ्यावर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:25 IST2021-07-09T04:25:25+5:302021-07-09T04:25:25+5:30

उंब्रज : पुणे-बंगलोर महामार्गालगत असणाऱ्या शिवडे गावाच्या हद्दीत उत्तरमांड नदीतून सात ब्रास वाळू जेसीबीच्या साहाय्याने बेकायदेशीररीत्या उत्खनन करणाऱ्यावर उंब्रज ...

Crime against sand digger at Shivde | शिवडे येथे वाळू उत्खनन करणाऱ्यावर गुन्हा

शिवडे येथे वाळू उत्खनन करणाऱ्यावर गुन्हा

उंब्रज : पुणे-बंगलोर महामार्गालगत असणाऱ्या शिवडे गावाच्या हद्दीत उत्तरमांड नदीतून सात ब्रास वाळू जेसीबीच्या साहाय्याने बेकायदेशीररीत्या उत्खनन करणाऱ्यावर उंब्रज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. गणेश मुकुटराव थोरात (रा. कोर्टी, ता. कऱ्हाड) असे संबंधिताचे नाव आहे.

याबाबत उंब्रज पोलिसांनी दिलेली माहिती अशी, या प्रकरणी शिवडे गावचे तलाठी पद्मभूषण जाधव यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार ४ जुलै रात्री नऊ वाजण्याच्या दरम्यान तलाठी जाधव यांना शिवडे गावातील एकाचा फोन आला. उत्तरमांड नदीच्या ब्रिटिशकालीन बंधाऱ्यालगतच्या नदीपात्रात काहीजण जेसीबीच्या साहाय्याने वाळू उपसा करीत आहेत, असे सांगण्यात आले. त्यामुळे तलाठी जाधव संबंधित ठिकाणी गेले. तेथे शिवडे ग्रामस्थ जमा झाले होते. त्यांनी सांगितले की, नदीच्या पात्रातून जेसीबी व दोन डंपरने वाळू काढली आहे. यानंतर तलाठी जाधव यांनी अधिक चौकशी करता त्यांना गणेश थोरात यांनी बेकायदेशीर उत्खनन करून वाळू चोरून नेली असल्याचे निदर्शनास आले. सदर वेळी रात्र असल्याने तलाठी पद्मभूषण जाधव यांनी दुसऱ्या दिवशी नदीपात्रात जाऊन पंचनामा केला. संबंधित ठिकाणाहून अंदाजे ७२०० रुपयांची सात ब्रास वाळू उत्खनन केल्याचे दिसून आले. त्यांनी याबाबतचा अहवाल तहसीलदार यांना पाठविला. त्यानंतर उंब्रज पोलिसांत तक्रार दिली आहे. हवालदार असीफ जमादार हे तपास करीत आहेत.

Web Title: Crime against sand digger at Shivde