नियमापेक्षा अधिक वऱ्हाडी आल्याने लग्न मालकावर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:39 IST2021-04-06T04:39:07+5:302021-04-06T04:39:07+5:30
सातारा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लग्न समारंभासाठी प्रशासनाने केवळ ५० जणांना परवानगी दिली असताना ७० हून अधिक वऱ्हाडी मंडळी आल्याने ...

नियमापेक्षा अधिक वऱ्हाडी आल्याने लग्न मालकावर गुन्हा
सातारा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लग्न समारंभासाठी प्रशासनाने केवळ ५० जणांना परवानगी दिली असताना ७० हून अधिक वऱ्हाडी मंडळी आल्याने ठोसेघर येथील लग्न मालकावर सातारा तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
अप्पाजी भगवंत चव्हाण (रा. ठोसेघर, ता. सातारा), यशवंत खाशाबा जाधव (रा. घोटेवाडी, ता. पाटण) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस नाईक हेमंत ननावरे यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून जिल्हा प्रशासनाने लग्नात केवळ पन्नास लोकांना उपस्थितीचा नियम लागू केला आहे; परंतु त्याची अंमलबजावणी न करता सर्रास नियमांची पायमल्ली होत असल्याने कडक कारवाईच्या सूचना पोलिसांना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार दि. ३ रोजी ठोसेघर (ता.सातारा) येथे संशयितांनी त्यांच्या मुलांचा लग्न समारंभ आयोजित केला होता. त्या सोहळ्याला केवळ ५० लोकांची परवानगी असतानादेखील ७० हून अधिक लोकांची गर्दी जमल्याची माहिती सातारा तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सजन हंकारे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पोलीस नाईक हेमंत ननावरे यांना कारवाईच्या सूचना दिल्या. ननावरे यांनी ठोसेघर येथे जाऊन गर्दीबाबत मिळालेल्या माहितीची खात्री करून दोघांवर गुन्हा दाखल केला.