कोयनानगर : ‘सध्या राज्याला चार हजार मेगावॅट विजेची टंचाई जाणवत आहे. या वीज टंचाईमुळे अनेक मोठ-मोठे उद्योग धंदे परराज्यात स्थलांतरित होत आहेत. ही घटना मनाला क्लेष देणारी आहे. यामुळे पीक अवर्सला कोयना जलविद्युत प्रकल्पातून होणारी वीजनिर्मिती फायद्याची असून, यासाठी स्थानिकांनी सहकार्य करावे. या मोठ्या प्रकल्पासाठी अडवणूक करणाऱ्या स्थानिकांचा विचार केला जाईल. त्यांच्यावर अन्याय होणार याची दक्षता मी स्वत: घेणार आहे. मात्र, हे काम विनाकारण बंद पाडण्यासाठी कामगारांना मारहाण करणाऱ्यांना प्रोत्साहन देणाऱ्या पुढाऱ्यांवर गुन्हे दाखल करत कारवाई करावी,’ असे आदेश पालकमंत्री विजय शिवतारे यांनी दिला.दोन दिवसांच्या कोयना प्रकल्प पाहणीसाठी आलेल्या मंत्री शिवतारे यांनी सोमवारी सकाळी कोयना प्रकल्पातील सर्व अधिकारी, पोलीस प्रशासन यांच्यासह राज्याच्या विकासाचे महाशिल्प असणाऱ्या कोयना प्रकल्पाची पाहणी केली आणि सूचना दिल्या. यावेळी कोयना प्रकल्पाचे मुख्य अभियंता राजेंद्र पानसे, अधीक्षक अभियंता राजेंद्र मोहिते, बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता उपेंद्र रोकडे, धरण व्यवस्थापन कार्यकारी अभियंता एम. आय. धरणे, उपकार्यकारी अभियंता मिलिंद किटवाडकर, मनोज कर्नाळे, पटेल कंपनीचे साईड इंचार्ज अशोकराव देसाई, बी. टी. पाटील कंपनीचे श्रीमहेंद्र आप्पा, शिवसेना उपजिल्हा प्रमुख जयवंतराव शेलार, तालुकाप्रमुख रवींद्र पाटील, गजानन कदम, अंकुश देसाई, बाळासाहेब पवार, प्रदीप पाटील यांची उपस्थिती होती.पालकमंत्री म्हणाले, या प्रकल्पासाठी त्याग केलेल्या स्थानिक मूळ शेतकऱ्यांना रोजगार देण्याचे धोरण अवलंबणार आहे. मात्र, त्यांनी इतरांच्या नादी न लागता अडचणी निर्माण करण्याचे काम करू नये. सध्या निर्माण झालेल्या प्रश्नाबाबत मंत्रालयात येत्या दहा दिवसांत बैठक घेणार आहे. तसेच गाव पातळीवर फेब्रुवारीमध्ये ग्रामसभा घेऊन सर्वांना विश्वासात घेत काम केले जाणार असल्याचे सांगून कोट्यवधींचा हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी सर्व आयुधे आणि घटकांची मदत घ्या. कोण जर ऐकत नसेल तर कायद्याने काम करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी अधिकारी व पोलीस प्रशासनाला दिल्या. चौकट२०१४ रोजी ८० मॅगावॅट वीजनिर्मिती करणारा हा प्रकल्प पूर्ण होणे गरजेचे होते. याला जबाबदार कोण? असा प्रश्न त्यांनी उपस्थित करून अधिकारी व ठेकेदारांना धारेवर धरले. या कामात यापुढे कोणतीही दिरंगाई होणार नाही, याची दक्षता घ्या. दिरंगाई झाली तर अधिकारी व ठेकेदारावर कारवाई करणार असून, हलगर्जी करणाऱ्या कोणालाही पाठीशी घालू नका, असे स्पष्ट आदेश त्यांनी दिले.दरम्यान, पालकमंत्री रविवारी रात्री सर्व अधिकाऱ्यांची आणि त्यानंतर शिवसेनेच्या जिल्हा पदािधकाऱ्यांची गोपनीय बैठक घेऊन प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी अधिकाऱ्यांना चार्ज कले. तर जिल्ह्यात शिवसेनेचा भगवा फडकला पाहिजे, यासाठी लागेल ती ताकद देण्याची ग्वाही त्यांनी या बैठकीत दिली. यावेळी पाटणचे आमदार शंभूराज देसाई, शिवसेनेचे संपर्क प्रमुख नितीन बानुगडे-पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हर्षद कदम, सह संपर्क प्रमुख संजय मोहिते, नरेंद्र पाटील यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)
गुंडांना प्रोत्साहन देणाऱ्या नेत्यांवर गुन्हा
By admin | Updated: January 20, 2015 00:01 IST