सचिवासह १५ संचालकांविरोधात गुन्हा
By Admin | Updated: November 27, 2014 00:24 IST2014-11-26T22:39:34+5:302014-11-27T00:24:22+5:30
दहिवडी सोसायटी अपहार प्रकरण--लोकमतचा दणका

सचिवासह १५ संचालकांविरोधात गुन्हा
वाठार स्टेशन : दहिगाव, ता. कोरेगाव येथील दहिगाव विकास सेवा सोसायटीमध्ये २०११ ते २०१३ या आर्थिक वर्षात या सेवा सोसायटीचे सचिव विजय शांताराम कोकणे (रा. देऊर, ता. कोरेगाव) याच्यासह विद्यमान १५ संचालकांनी ६६ लाख ११ हजार ५६८ रुपयांची अपहार केल्याबाबतची फिर्याद लेखापरीक्षक सुचित्रा नलावडे यांनी आज (बुधवारी) वाठार पोलीस ठाण्यात दिली आहे. यावरून वरील एकूण १५ जणांविरोधात वाठार पोलीस गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
यावरून अधिक माहिती अशी की, !देऊर विकास सेवा सोसायटीमध्ये कोट्यवधीचा भ्रष्टाचार‘ हे वृत्त सर्वप्रथम ‘लोकमत’ने प्रसिद्ध केल्यानंतर या सोसायटीच्या चौकशीचा तपास सहकार खात्याकडून गतिमान झाला. दरम्यान, याच सोसायटीचे सचिव देऊर शेजारील दहिगाव विकास सेवा सोसायटीचेही काम पाहत असल्याने ‘लोकमत’ने या सोसायटीतही भ्रष्टाचार असल्याचे प्रसिद्ध केले होते. यावरून या दोन्ही सोसायट्यांच्या भ्रष्टाचाराची मालिकाच ‘लोकमत’ने उजेडात आणली
होती.
अखेर दहिगाव सेवा सोसायटीबाबत जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, सातारा यांच्या आदेशान्वये या सेवा सोसायटीचे लेखापरीक्षक सुचित्रा नलवडे यांनी या सोसायटीत दि. १ एप्रिल २०११ ते ३१ मार्च २०१२ व १ एप्रिल २०१२ ते ३१ मार्च २०१३ या आर्थिक वर्षात सचिव कोकणे यांनी व्यवहारातील नोंदीतील फरक, मेंबर शेअर्स यादीतील फरक, बँक चालू ठेव खात्यातील फरक, दुबार कर्जवाटप यामध्ये एकूण ६६ लाख ११ हजार ५६८ एवढ्या रकमेचा अपहार केल्या असल्याची फिर्याद आज बुधवार, दि. २६ रोजी वाठार पोलीस ठाण्यात दिली आहे. या अपहारातील मुख्य सूत्रधार याच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दहिगाव विकास सेवा सोसायटीतील अपहाराप्रमाणेच जिल्ह्यात सर्वाधिक अपहार देऊर विकास सेवा सोसायटीत झाला असून, या सोसायटीचा हा लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे. (वार्ताहर)
सहकार खात्याचे मौन!
कोरेगाव तालुक्यातील देऊर, दहिगाव, सेवा सोसायटीतील अपहारात केवळ सचिवांनाच दोषी धरण्याबरोबरच जिल्हा बँकेचे विकास अधिकारी, लेखापरीक्षक यांच्याबाबत सहकार खात्याचे मौन का? अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.