लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : कोरोनामुळे जमावबंदी आदेश असतानाही येथील सदरबझार परिसरात सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी बर्थडे बॉय प्रशांत पवार याच्यासह १४ जणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दि. ३१ मे रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास सदर बझारमधील सार्वजनिक ठिकाणी केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. या वेळी अनेक युवक एकत्र आले होते. कोरोनामुळे जिल्हाधिकाऱ्यांचा जमावबंदी आदेश असतानाही त्याचे उल्लंघन करण्यात आले. याप्रकरणी प्रशांत पवार, विजय पवार, नितीन पवार, अमित सोलंकी, लक्ष्मण जाधव, सलीम शेख, अमर पवार, गुलाब यादव, भारत सोलंकी (सर्व रा. सदरबझार, सातारा) व त्याच्यासमवेत अनोळखी चार ते पाच जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत हवालदार विशाल धुमाळ यांनी तक्रार दिली आहे. हवालदार भिसे हे तपास करीत आहेत.
.....................................................