स्मशानभूमीतील सौरदिवा वर्षभरापासून बंद
By Admin | Updated: January 8, 2015 23:59 IST2015-01-08T23:07:12+5:302015-01-08T23:59:45+5:30
ग्रामस्थांत नाराजी : पळशीकरांना रात्रीच्या वेळी करावा लागतोय अनेक अडचणींचा सामना

स्मशानभूमीतील सौरदिवा वर्षभरापासून बंद
पळशी : माण तालुक्यातील पळशी गावात बसविलेले सौरदिवे नसून अडचण, असून खोळंबा अशा स्थितीत आहेत. स्मशानभूमीतील सौरदिवा गेल्या वर्षभरापासून बंद अवस्थेत आहे.सौरदिवा बसविल्यानंतर काही दिवसच तो चालू होता. त्यानंतर आजतागायत हा दिवा बंद अवस्थेतच आहे. पळशी ग्रामपंचायतीने विजेची बचत व्हावी, या हेतूने सौरदिवा बसविला खरा; पण या दिव्याची देखभाल करण्याची तसदी कोणीच घेतलेली दिसून येत नाही. त्यामुळे येथील ग्रामस्थांना अंधारात अंत्यसंस्कार करावे लागत आहेत. गेल्या वर्षभरापासून येथील ग्रामस्थ या समस्येला तोंड देत आहेत. ग्रामपंचायतीने तत्काळ लक्ष घालून सौरदिवा दुरुस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.येथील हनुमान मंदिर ते स्मशानभूमी या मार्गावर सर्वत्र अंधारच असतो. लोकांना अंधारात चाचपडत चालावे लागते. रात्रीच्या वेळी गावात कोठे स्मशानभूमीत विजेची सोय नसल्याने अंत्यविधीसाठी संबंधित कुटुंबातील व्यक्तींना प्रथम गावात कोणाकडे गॅसबत्ती आहे का, याची चौकशी करत फिरावे लागत आहे. या मार्गावर अंधार असल्याने दिवाबत्तीशिवाय स्मशानभूमीत जाता येत नाही. या मार्गावरदेखील विजेची सोय करण्यात यावी, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. (वार्ताहर)
गावात याठिकाणचे सौरदिवे नादुरुस्त
अंधारात येता-जाता लोकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. स्मशानभूमीतील सौरदिवा दुरुस्त करावा, तसेच बाजार पटांगणातील सौरदिवा बंद असल्याने शनिवारच्या आठवडी बाजारात लोकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. गावातील अनेक ठिकाणचे सौरदिवे बंद असवस्थेत असून संबंधितांनी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे.
- बजरंग खाडे, पळशी
गावातील सौरदिव्यांच्या समस्येवर ग्रामपंचायत बैठकीत चर्चा झालेली आहे. संबंधित एजन्सीला आम्ही लवकरात लवकर याबाबत सांगणार असून, लवकरच बंद सौरदिवे सुरू करण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे.
- प्रकाश कदम, ग्रामविकास अधिकारी, पळशी