बेसुमार वृक्षतोड अन कोळशाची निर्मिती
By Admin | Updated: April 5, 2017 16:15 IST2017-04-05T16:15:51+5:302017-04-05T16:15:51+5:30
येरळा तलाव परिसरातील चित्र : सहपालकमंत्री शुक्रवारी करणार पाहणी!

बेसुमार वृक्षतोड अन कोळशाची निर्मिती
लोकमत आॅनलाईन
वडूज : बेसुमार वृक्षतोड करण्याबरोबरीने शासकीय जागेवरच अतिक्रमण करून त्याच ठिकाणी कोळसा निर्माण करीत असल्याचे काही पुरावे येरळा तलाव परिसरात दिसून येत आहेत. मात्र, ज्या विभागांतर्गत ही जमीन येत आहे तो विभाग गुंडगिरीला खतपाणी घालत असल्याचे सदृश चित्र पाहावयास मिळत आहे.
वाळू माफियांना क्लिन चीट कशासाठी हे न उलगडणारे कोडे? तर आहेच. मात्र, महसूल विभाग, येरळवाडी मध्यम प्रकल्प आणि वनविभाग नेमके कोणाला वाचविण्यासाठी धडपडत आहे, या चचेर्ला तालुक्यात उधाण आले आहे.
कायम दुष्काळी भाग म्हणून खटाव तालुक्याचा नामोल्लेख राज्यभर होत असतो. टंचाई जाणवू लागली की प्रत्येक पक्षाच्या नेतेमंडळींचे राजकीय सुगीचे दिवस सुरू होतात, हा इतिहास आहे. या भागासाठी ठोस काही न करता आपली राजकीय पोळी आजपर्यंत बऱ्याच पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी भाजून घेतलेली आहे. नुकत्याच झालेल्या सहपालकमंत्र्यांच्या आढावा बैठकीत सुद्धा अंबवडे ग्रामस्थ आणि काही सामाजिक कार्यकर्त्यांनी ह्ययेरळा तलाव बचावह्ण यासाठी तोंडी सांगून व लेखी निवेदन देऊन सुद्धा या विषयाला फाटा दिला. या बैठकीत काही नेतेमंडळींनी येरळा पात्रातील वाळूचे लिलाव काढण्यासाठीच्या सूचना मांडल्या तर पात्रात पडलेले मोठेले खड्डे वाळू उपसा करणाऱ्यांकडूनच भरून घ्यावेत, असा मौलिक सल्ला ही देण्यात ते मागे राहिले नाहीत.
पिण्याच्या पाण्यासाठी आणि शेती पाण्यासाठी झालेल्या बैठकीत सर्वांनीच पाण्याची मागणी केली. उरमोडीचे पाणी पूर्ण क्षमतेने सोडण्याचीही मागणी सर्वच स्तरावर झाली. परंतु हे पाणी ज्या तलावात सोडण्यात येणार आहे त्या येरळा तलाव परिसराची वाळू माफियांनी काय दुर्दशा केली आहे, हे ज्ञात असताना देखील कोणत्याच लोकप्रतिनिधींनी यावर आवाज काढला नाही, ही तालुक्याच्या हिताच्या दृष्टीने मोठी शोकांतिका म्हणावी लागेल.
नदीच्या पात्रातील बेसुमार खड्डे कोवळ्या जिवांचे जीव घेऊन जात असल्याच्या घटना ताज्या असताना देखील प्रशासन याबाबत गंभीर नाही. येरळा तलाव फुटण्याच्या प्रतीक्षेत हे प्रशासन आहे का?, असा यक्ष प्रश्न जाणकारांमधून उपस्थित केला जात आहे. महसूल विभाग कुंभकर्णी झोपेतून जागा झाला असला तरी तहसीलदार सीमा होळकर यांना या कामी योग्य ते सहकार्य मिळत नसल्याचे जाणवत आहे. आढावा बैठक संपल्या नंतर विश्रामगृहातील पत्रकार परिषदेत सहपालकमंत्री खोत यांनी या विषयी आपण शुक्रवार, दि. ७ रोजी घटनास्थळी जाऊन पाहणी करू, असे स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
तहसीलदारांच्या संगीत खुर्चीचा खेळ...!
तालुक्यात चांगले काम सुरू करून विधायक टप्प्यापर्यंत पोहोचण्यापूर्वीच तहसीलदार यांना काहीवेळा (सक्तीच्या) रजेवर जावे लागत आहे. याचे कारण म्हणजे नवीन पदभार स्वीकारणाऱ्यांचा प्रोमिशनल पिरेड होय. त्यामुळे सीमा होळकर यांच्या जागी आता तहसीलदार म्हणून प्रियांका पवार यांनी पदभार स्वीकारला आहे. यापूर्वी तहसीलदार विवेक साळुंके यांनी अतिक्रमण हटाव मोहीम तीव्र केली. तद्नंतर वाळू माफियांच्या मुसक्या आवळण्यास होळकर यांनी प्रारंभ केला होता. आता या तालुक्यासाठी विकासात्मक ठोस काही तरी होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यापूर्वीच तहसीलदारांची खुर्ची खेळातल्या संगीत खुर्ची सारखी वारंवार बदलू लागली आहे.