अजगराला पाहुणचार.. मगरीची सर्कस !

By Admin | Updated: July 18, 2016 00:29 IST2016-07-18T00:23:15+5:302016-07-18T00:29:30+5:30

वनखात्याच्या नर्सरीत मुक्काम : सातारा जिल्ह्यात दोन प्राण्यांबद्दल ‘माणुसकीचा विरोधाभास’

Crazy hospitality .. crocodile circus! | अजगराला पाहुणचार.. मगरीची सर्कस !

अजगराला पाहुणचार.. मगरीची सर्कस !

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात दहा फुटी अजगर अन् सात फुटी मगर सापडल्याने सातारकरांमध्ये चर्चेला ऊत आलाय. एकीकडे भेकराला पकडण्याच्या नादात जखमी झालेल्या अजगराला चिकन-अंडी खाऊ-पिऊ घालण्यात ‘वन्यजीव’ विभागाचे अधिकारी व्यस्त झालेत, तर दुसरीकडे मगरीच्या पाठीवर बसून तिला डिवचण्यात स्थानिक तरुणांनी धन्यता मानली. दरम्यान, मगरीला सातारा येथील वनविभागाच्या नर्सरीत ठेवण्यात आले असून सोमवारी पश्चिम घाटातील मगरिंच्या अधिवास क्षेत्रात तीला सोडण्यात येणार आहे.
पाटण तालुक्यातील धानकल हे गाव सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये वसले आहे. या गावात रस्त्याकडेला पडलेल्या अजगराला वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतले. भेकराशी झालेल्या झटापटीत अजगराचा जबडा फाटला होता. त्यामुळे कऱ्हाडात पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याच्या जबड्यावर सहा टाक्यांची शस्त्रक्रिया केली. त्यानंतर त्याला ‘वन्यजीव’ विभागाच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.  या अजगराला अंडी अन् कोंबडीच्या मांसाचा खुराक दिला जात असून, त्याची प्रकृती सुधारत असल्याचे अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
प्रकृती सुधारल्यानंतर त्याला पुन्हा सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात सुरक्षित ठिकाणी सोडले जाणार आहे.
दरम्यान, सातारा-महाबळेश्वर रस्त्यावरील कण्हेर धरणाजवळ सात फुटी मगर आढळली. सध्या त्यांचा प्रणयकाळ असल्याने हे प्राणी जलाशयाच्या काठावर आढळून येतात. येथील गावकऱ्यांनी मात्र प्रथमच मगर पाहिल्याने त्यांचा उत्साह दाटून आला. काही तरुणांनी या मगरीच्या पाठीवर बसून अन् तिला दोरीने बांधून डिवचण्याच्या प्रयत्न केला, तेव्हा चवताळलेल्या मगरीच्या हल्ल्यात कडव नामक (रा. साबळेवाडी) तरुण जखमी झाला. मग मात्र तत्काळ वनखात्याच्या कर्मचाऱ्यांना बोलावून घेण्यात आले आणि मगरीला पडकडण्यात यश आले. मगर पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. (प्रतिनिधी)
 

Web Title: Crazy hospitality .. crocodile circus!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.