पाटण : कायद्याचे रक्षकच कसे भक्षक बनतात याचे प्रत्यक्ष चित्र बुधवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास कोयना नदीवरील नेरळे पुलावर पाहावयास मिळाले. दुचाकीवरील दोन खाकी वर्दीवाले चालत्या वाहनातूनच ‘पाचशेची पत्ती’ घेतात आणि खिशात घालतात. पाटणच्या दिशेने निघालेल्या वाहनधारकांचा आणि या खाकीधारकांचा असा कोणता ‘व्यवहार’ होता, हे महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोयनाच जाणे! पाटण तालुक्यात पवनचक्कीची पाती फिरायला लागली, तशी खाकी वर्दीवाल्यांच्या नशिबाची चक्रेदेखील फिरली. कर्तव्य बजावण्याच्या नावाखाली ही खाकी वर्दी पवनचक्क्यांच्या मालकांना व कर्मचाऱ्यांना त्यांच्याच गाडीत बसून संरक्षण देऊ लागली आहेत. दुसरीकडे सामान्य माणूस मात्र न्यायासाठी चकरा मारून थकला तरी त्याची दखल घेतली जात नाही. एक विभाग सांभाळण्याची जबाबदारी असलेल्या एका हवालदाराने अलीकडे ताळच सोडला असून, त्यालाच बुधवारी ‘पाचशेची पत्ती’ पावली. या बहाद्दराने बेकायदा दारूविक्रेत्यांना अभय देताना त्यांच्याच दुकानात बसून फुकटची ‘घेतल्याचे’ अनेकांनी पाहिले आहे. वर्दी अंगात असूनही एवढे बिनधास्त कारनामे पाटणमध्ये वर्दीलाच बदनाम करीत आहेत. गुरुवारच्या बाजारात वर्दीच्या जिवावर फुकटचा बाजार व भाजीपाला पिशवी भरून न्यायचा, हे दृश्य सरसकट सर्वच वर्दीवाल्यांना बदनाम करणारे ठरत आहे. (प्रतिनिधी)
कोयनेच्या साक्षीने चवलीपावली
By admin | Updated: June 26, 2014 00:40 IST