‘कोविड स्पेशल’ रेल्वेमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला झटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:11 IST2021-02-05T09:11:48+5:302021-02-05T09:11:48+5:30
कोरेगाव : लॉकडाऊननंतर आता सर्व काही सुरळीत होत असले, तरी रेल्वेने मात्र अद्याप निर्णय न घेतल्याने काही ठराविक गाड्या ...

‘कोविड स्पेशल’ रेल्वेमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला झटका
कोरेगाव : लॉकडाऊननंतर आता सर्व काही सुरळीत होत असले, तरी रेल्वेने मात्र अद्याप निर्णय न घेतल्याने काही ठराविक गाड्या सुरू आहेत.
त्याचे नामकरण ‘कोविड स्पेशल’ असे करून, त्याच्या तिकिटाला काहीसा अधिभार
लावल्याने सर्वसामान्य प्रवाशांना ते परवडणारे नाही. सातारा
जिल्ह्यातून धावणार्या पाच एक्स्प्रेसला कोविड स्पेशलचे बिरुद लावण्यात आले आहे. सातारा जिल्हा हा रेल्वेच्याबाबतीत अत्यंत सधन म्हणता येईल, असा आहे. दक्षिणोत्तर रेल्वे धावत असल्याने कोल्हापूर, सांगली, मिरज, कऱ्हाड,
सातारा, लोणंद ही शहरे पुण्या-मुंबईला जोडली गेली आहेत. अगदी देशातील दोन टोकांपर्यंत धावणाऱ्या रेल्वे सातारा जिल्ह्यातून प्रवास करत असल्याने
सर्वसामान्यांसाठी त्या अत्यंत उपयोगाच्या आणि फायद्याच्या ठरत होत्या.
जिल्ह्यात सातारा कऱ्हाडसह १३ रेल्वे स्थानके असून, ग्रामीण भागाशी रेल्वे
जोडली गेली आहे. कोरोना काळात लॉकडाऊनमध्ये सर्वच व्यवहार ठप्प झाले
असताना रेल्वेने देखील आपल्या सेवा बंद केल्या होत्या. अनलॉकनंतर आता सर्वच काही रुळावर आले असले तरी रेल्वे मात्र पूर्ण क्षमतेने रुळावर
आलेली नाही.
सातारा जिल्ह्यातून सद्यस्थितीत हुबळी- दादर, अजमेर-जोधपूर, वास्को-
दिल्ली या आंतरराज्य एक्स्प्रेससह कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्स्प्रेस व कोल्हापूर-मुंबई कोयना एक्स्प्रेस धावत आहेत. हुबळी-दादर एक्स्प्रेसला केवळ कराड येथे थांबा असून, सातारा थांबा बंद करण्यात आला आहे. उर्वरित एक्स्प्रेसपैकी अजमेर-जोधपूर, वास्को- दिल्ली या केवळ सातारा आणि कऱ्हाड
येथे थांबतात. कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्स्प्रेस व कोल्हापूर-मुंबई कोयना एक्स्प्रेस या बऱ्यापैकी जिल्ह्यातील प्रमुख स्थानकांवर थांबतात. या पाचही एक्स्प्रेसला कोविड स्पेशल हे बिरुद लावण्यात आले असून,
निर्धारित तिकीटदरापेक्षा काही जादा शुल्क आकारले जात आहे. रेल्वे स्थानकावरील तिकीट खिडक्या अजून उघडल्या गेल्या नाहीत, त्यामुळे संगणकीय प्रणाली अथवा मोबाईलवरून ऑनलाईन आरक्षण करूनच या एक्स्प्रेसमधून प्रवास
करावा लागत आहे. ज्यावेळी आरक्षण केले जाते, त्यावेळी नेमके किती शुल्क
आहे, हे प्रवाशांना समजत आहे. त्यामुळे नेमके प्रवास भाडे किती आणि नेमके
जादा शुल्क किती, याचा अद्याप मेळ लागत नाही.
चौकट :
पाचच एक्स्प्रेस रुळावर
लॉकडाऊनपूर्वी सातारा जिल्ह्यातून दहापेक्षा अधिक एक्स्प्रेस धावत
होत्या. दक्षिणेकडील राज्ये उत्तरेतील राज्यांना जोडणाऱ्या या एक्स्प्रेस होत्या. काही साप्ताहिक, तर काही दैनंदिन धावत होत्या. त्याचबरोबर
कोल्हापूर-मिरज-पुणे मार्गावर दोन पॅसेंजर धावत होत्या. आता सर्व बंद असून, केवळ पाच एक्स्प्रेस धावत आहेत.
चौकट :
एक्स्प्रेस धावतात, तर पॅसेंजर का नाही
पॅसेंजर अनिश्चित काळापर्यंत बंद ठेवण्यात आल्याने ग्रामीण भागातील
प्रवाशांची गैरसोय होत आहे. एक्स्प्रेस धावतात, तर पॅसेंजर का नाही,
याबाबत रेल्वे प्रशासनाने निर्णय घेणे आवश्यक आहेे.
- मनोहर वाघ, चांदवडी