फूलकळीसाठी शेतीला जाळीचं पांघरूण

By Admin | Updated: August 10, 2015 21:17 IST2015-08-10T21:17:45+5:302015-08-10T21:17:45+5:30

शेतकऱ्यांची क्लृप्ती : पाखरांना अटकाव करण्यासाठी होतोय जाळीचा वापर

Covering the net for farming | फूलकळीसाठी शेतीला जाळीचं पांघरूण

फूलकळीसाठी शेतीला जाळीचं पांघरूण

बागायती क्षेत्रामध्ये उसाचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले असल्याने त्याच्या सोबतीला पूरक व्यवसाय म्हणून माळव्याची पिके घेतली गेली आहेत. उसाला नियमित पाणी दिले जात असल्याने माळव्याच्या पिकांनाही त्याबरोबरच पाणी दिले जाते. मात्र, सध्या माळव्यांच्या पिकांवरील फूलकळ्या पक्षी खात असून, त्याच्या पासून बचाव करण्यासाठी शेतकरी नेट जाळींचा वापर करत आहेत. खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामांमध्ये कडधान्यांची पिके घेण्याचे प्रमाण जास्त असते. खरीप हंगामात घेवडा, हायब्रीड, सोयाबीन, चवळी, उडीद, मका आदी पिके घेतली जातात, तर रब्बी हंगामात शाळू पीक घेतले जाते. जिरायत क्षेत्र मोठे असल्याने पक्ष्यांना हवे ते खाद्य मिळते. त्यामुळे पक्ष्यांचा या क्षेत्रात जास्त वावर असतो. शेतकऱ्यांनी सध्या आपल्या शेतशिवारात उसाबरोबर माळव्यांचीही पिके घेतली आहेत. या माळव्यांच्या पिकांवर फूलकळी आल्या असून, त्या पक्ष्यांकडून खाल्ल्या जात आहेत. त्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. नदी, ओढे व विहिरींवर जलचरांचे प्रमाण अत्यल्प असल्याने पक्ष्यांनी वेलवर्गीय माळव्याकडे मोर्चा वळविला आहे. पक्षी काकडी, दोडका, कारली या पिकांवरील फुले खात आहेत. सुमारे सात-आठ फुट उंचीवर जाळी बांधण्यात आली असून, चारी बाजूंनी दोर बांधल्यामुळे वाऱ्याचा त्याला धोका होत नाही. जाळींना लहान छिद्रे असल्यामुळे पक्ष्यांना आत जाता येत नाही. सध्या कोपर्डे हवेली परिसरात काकडी, दोडका, कारली आदी वेलवर्गीय पिकांचे संरक्षण होते.

अलीकडच्या दोन वर्षांच्या काळामध्ये वेलवर्गीय पिकांना येणाऱ्या फूलकळ्या पक्षी खात असल्याने उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होत आहे. त्यामुळे मी काकडी पिकाचे रक्षण करण्यासाठी नेट जाळीचा वापर करत आहे.
- संतोष चव्हाण,
शेतकरी, कोपर्डे हवेली


नेट जाळीचे फायदे
पक्ष्यांच्या बरोबर मोकाट कुत्री गारव्यासाठी वेलवर्गीय पिकांमध्ये येऊन शेतजमीन उकरून त्याठिकाणी झोपतात. त्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते.
इतर रानटी प्राण्यांपासून संरक्षण होण्यासाठी या जाळीची मदत होते. जाळीला नेट असल्यामुळे उत्पादनाचे नुकसान होण्याचे प्रमाण थांबते.

जाळीची किंमत अशी
एका एकराला १५ हजार रुपये किमतीची जाळी. सरासरी ही जाळी तीन वर्षं टिकते. माळव्याचे पीक काढल्यानंतर ही जाळी गुंडाळून ठेवावे लागते.
जाळीचे प्रकार
अन् वापर
छोटी जाळी ही काकडीसाठी तर मोठी जाळी जनावरांपासून संरक्षण व्हावे म्हणून वापरली जाते. तंगूस दोऱ्यापासून तयार केली जाते. तसेच उन्हापासून संरक्षण व्हावे म्हणून शोभेची जाळी काही शेतकरी शेतशिवाराभोवती
लावतात.

Web Title: Covering the net for farming

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.