‘कृष्णा’ची निवडणूक तातडीने घेण्याचे न्यायालयाचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:38 IST2021-02-13T04:38:19+5:302021-02-13T04:38:19+5:30

कऱ्हाड : यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची वेळोवेळी पुढे ढकललेली पंचवार्षिक निवडणूक तातडीने घ्या; त्यासाठीची कार्यवाही लगेच करा, ...

Court orders immediate holding of 'Krishna' elections | ‘कृष्णा’ची निवडणूक तातडीने घेण्याचे न्यायालयाचे आदेश

‘कृष्णा’ची निवडणूक तातडीने घेण्याचे न्यायालयाचे आदेश

कऱ्हाड : यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची वेळोवेळी पुढे ढकललेली पंचवार्षिक निवडणूक तातडीने घ्या; त्यासाठीची कार्यवाही लगेच करा, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी (दि. १०) दिला. याबाबत न्यायालयाने राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाला आदेश दिल्याची माहिती कारखान्याचे सभासद डॉ. अजित देसाई यांनी दिली.

अजित देसाई यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, कारखान्याच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक मुदत सहा महिन्यांपूर्वी संपली आहे. गेल्या वर्षी निवडणूक होणे अपेक्षित होते. मात्र कोरोना महामारीच्या संकटामुळे सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या. या वर्षीच्या सुरुवातीस निवडणूक प्रक्रिया होणे अपेक्षित होते; परंतु कार्यकाल संपलेल्या सहकारी संस्थांची संख्या मोठी असल्यामुळे कृष्णा साखर कारखान्याची निवडणूक नेमकी कधी होणार, याबाबत संभ्रम होता. त्यामुळेच या संदर्भात उच्च न्यायालयात निवडणुकीची प्रक्रिया तातडीने सुरू करावी म्हणून याचिका दाखल करण्यात आली होती. न्यायमूर्ती आर. बी. धातुका व व्ही. जी. बीस्ट यांच्या खंडपीठासमोर या संदर्भात सुनावणी झाली. या प्रकरणी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, राज्य सरकार आणि कारखान्याला प्रतिवादी करण्यात आले होते. दरम्यानच्या काळात राज्य सरकारकडून २ फेब्रुवारी २०२१ रोजी निवडणूक होण्यासंदर्भाचा आदेश काढण्यात आला होता. तथापि याचिकाकर्ता व सभासद या नात्याने न्यायालयात यासंबंधी अजूनही ही प्रक्रिया सुरू झाली नसल्याचे निदर्शनास आणून दिले. यासंबंधी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणास स्पष्टपणे निर्देश द्यावेत, अशी विनंती केली. न्यायालयाने ही मागणी ग्राह्य मानून यासंबंधी निर्णय दिला. कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीची प्रक्रिया तातडीने सुरू करा, असे आदेशात म्हटले आहे. आदेशाची प्रत राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, साखर आयुक्त व कृष्णा सहकारी साखर कारखान्याला देण्यात आली आहे.

Web Title: Court orders immediate holding of 'Krishna' elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.