साताऱ्याजवळ कुरिअरच्या गाडीवर दरोडा; सात किलो सोन्याच्या विटा, चांदीची लूट

By दत्ता यादव | Updated: May 28, 2023 12:40 IST2023-05-28T12:39:50+5:302023-05-28T12:40:23+5:30

दरोडेखोरांनी गाडीतून तब्बल सात किलो वजनाच्या सोन्याच्या विटा आणि चांदीची लूट केली.

Courier's car robbed near Satara; Seven kg gold bricks, silver loot | साताऱ्याजवळ कुरिअरच्या गाडीवर दरोडा; सात किलो सोन्याच्या विटा, चांदीची लूट

साताऱ्याजवळ कुरिअरच्या गाडीवर दरोडा; सात किलो सोन्याच्या विटा, चांदीची लूट

सातारा: पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर बोरगाव, ता. सातारा गावच्या हद्दीत कुरिअरच्या गाडीवर चार ते पाच जणांनी सशस्त्र दरोडा घातला. दरोडेखोरांनी गाडीतून तब्बल सात किलो वजनाच्या सोन्याच्या विटा आणि चांदीची लूट केली. ही धक्कादायक घटना रात्री अडीच च्या सुमारास घडली.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, कोल्हापूर येथील एका कुरिअर कंपनीचे कर्मचारी  रात्री दोन वाजता पिकप गाडीतून सोन्याच्या विटा आणि चांदी घेऊन पुण्याला निघाले होते. कुरिअरची गाडी बोरगाव हद्दीत आल्यानंतर चार ते पाच सशस्त्र दरोडेखोरांनी  पीकअप गाडीचा थरारक पाठलाग  करून गाडी थांबवली. शस्त्राचा धाक दाखवून दरोडेखोरांनी अंदाजे 7 किलो वजनाच्या सोने आणि चांदीच्या विटांची लूट केली. यानंतर दरोडेखोर तेथून पसार झाले. या प्रकाराची माहिती बोरगाव पोलीस तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमला मिळाल्यानंतर पोलिसांनी जिल्ह्यात नाकाबंदी केली तर एक टीम पुण्याच्या दिशेने रवाना झाली.

लुटारूंचा पाठलाग करत असताना पोलिसांना पीकअप गाडी महामार्गावर सापडली. मात्र सोने-चांदी घेऊन दरोडेखोर  इनोव्हा कार आणि दुचाकीवरून पसार झाल्याचे समोर आले आहे. बोरगाव पोलीस ठाण्यात या घटनेची अद्याप नोंद झाली नव्हती.

Web Title: Courier's car robbed near Satara; Seven kg gold bricks, silver loot