भुयारी गटारवरून नगरसेवक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:39 IST2021-05-23T04:39:14+5:302021-05-23T04:39:14+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : भुयारी गटार योजनेच्या कामावरून शनिवारी सकाळी मंगळवार पेठेतील कोल्हटकर आळीमध्ये नगरसेवक विजय काटवटे व ...

भुयारी गटारवरून नगरसेवक
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : भुयारी गटार योजनेच्या कामावरून शनिवारी सकाळी मंगळवार पेठेतील कोल्हटकर आळीमध्ये नगरसेवक विजय काटवटे व ठेकेदार यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. या योजनेच्या खोदकामामुळे पाणीपुरवठ्याची नळ कनेक्शन कट झाली आहेत. शिवाय तीन आठवड्यांपासून जलवाहिनीला लागलेली गळती निघाली नसल्याचा आरोप करीत काटवटे यांनी ठेकेदाराला चांगलेच फैलावर घेतले. शिक्षण मंडळाचे माजी सभापती राम हादगे यांनी या ठेकेदाराला कडक शब्दांत समज दिल्यानंतर या वादावादीवर पडदा पडला.
सातारा शहरात ४२ कोटी रुपयांच्या भुयारी गटार योजनेचे काम शहराच्या पश्चिम भागात प्रगतिपथावर आहे. विठोबाचा नळ ते मंगळवार तळे रस्ता, तसेच गवंडी आळी, कोल्हटकर आळी, गुजर आळी कॉर्नर, कात्रेवाडा परिसर येथील सर्व रस्ते अंतर्गत जलवाहिन्या टाकण्यासाठी खोदण्यात आले आहे. या खोदकामात बरीचशी नळ कनेक्शन तुटल्याने वॉर्ड क्रमांक १७ मध्ये पाणीपुरवठ्याचा गोंधळ सुरू आहे. शनिवारी सकाळी भाजप नगरसेवक विजय काटवटे यांनी कोल्हटकर आळी येथे खोदकामावर उपस्थित असणाऱ्या उपठेकेदाराला पाण्याची गळती कधी काढणार? असा जाब विचारला. तेव्हा ठेकेदाराने साहित्य मिळत नसल्याची तक्रार केली. तेव्हा संयम संपलेल्या काटवटे यांनी ‘तीन आठवडे खड्डे खणून झाले तुम्हाला साधी गळती निघत नाही,’ अशा कडक शब्दांत सुनावत ठेकेदाराला फैलावर घेतले. ठेकेदारानेही ‘तुम्ही बोलणार असाल तर मी आत्ता काम बंद करतो,’ असे प्रत्युत्तर दिल्याने तणाव वाढला. या वादावादीत राम हादगे यांनी मध्यस्थी करीत काटवटे यांना शांत केले आणि नगरसेवकांशी सौजन्याने बोला, अशी समज ठेकेदाराला दिली.
(कोट)
.. तर ठिय्या आंदोलन करणार
सद्य:स्थितीला भुयारी गटार योजनेचा फायदा कमी आणि तोटेच अधिक सहन करावे लागत आहेत. आताच ही परिस्थिती तर पावसाळ्यात काय होईल, याची कल्पनाच करू शकत नाही. योजनेचे काम वेळेत मार्गी लावून जर पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही तर मुख्याधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर नागरिकांसमवेत ठिय्या आंदोलन केले जाईल, असा इशारा नगरसेवक विजय काटवटे यांनी दिला आहे.
फोटो : जावेद खान