जावलीतून अजूनही कोरोनाचा प्रभाव कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:35 IST2021-04-05T04:35:34+5:302021-04-05T04:35:34+5:30
कुडाळ : संपूर्ण जग कोरोनाच्या महाभयंकर संकटात गेले वर्षभर अडकून पडले आहे. गतवर्षीच्या मार्च महिन्याचा रुग्णांचा आकडा पाहता, ...

जावलीतून अजूनही कोरोनाचा प्रभाव कायम
कुडाळ : संपूर्ण जग कोरोनाच्या महाभयंकर संकटात गेले वर्षभर अडकून पडले आहे. गतवर्षीच्या मार्च महिन्याचा रुग्णांचा आकडा पाहता, पुन्हा या संख्येत भर पडू लागली आहे. यामुळे कोरोना संपला आहे, असे म्हणून बिनधास्त वागण्यापेक्षा नागरिकांनी काळजी घेतली पाहिजे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
तालुक्यातील ५३ गावांमध्ये सुमारे १५२ ॲक्टिव्ह रुग्ण असून तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रनिहाय बामणोलीत १०, केळघर ३३, कुडाळ ४८, कुसुंबी २०, सायगांव ४१ अशी कोरोना ॲक्टिव्ह रुग्णसंख्या आहे. यामुळे कोरोनाची छाया आता हळूहळू पुन्हा सगळीकडे पसरू लागली आहे. आरोग्य विभागाच्या त्रिसूत्रीचा अवलंब करून, घरीच राहा, सुरक्षित राहा, हा कानमंत्र जपायला हवा. तरच आपल्या सर्वांच्या सहकार्याने कोरोनाला हद्दपार करता येईल.
राज्याबरोबरच जिल्ह्यातील बधितांचा आकडा वाढताना दिसत आहे. मोठ्या शहरांमध्ये कडक निर्बंध घातले आहेत. अनेक ठिकाणे पुन्हा नव्याने कोरोना हॉट स्पॉट होत असून तालुक्यातही रुग्णसंख्येत भर पडत आहे. आरोग्य विभाग, महसूल, पोलीस यंत्रणा वारंवार सूचना देत असूनही लोकांमध्ये याचे गांभीर्य पाहायला मिळत नाही. अजूनही विनामास्क फिरणाऱ्यांची संख्या अधिक आहे. आपण आपल्याबरोबरच समाजाच्या आरोग्याचीही काळजी घ्यायला हवी.
तालुका कोरोनामुक्तीच्या वाटेवर असतानाच जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात नव्याने कोरोना रुग्णांची भर पडली होती. आरोग्य विभागाच्या नियोजनामुळे तालुक्यातील आटोक्यात आली. मात्र मार्च महिन्यात तालुक्यात कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्याचे दिसत आहे. यासाठी सर्वांनीच काळजी घ्यायला हवी. आरोग्य यंत्रणेकडून १ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांना प्राथमिक आरोग्य केंद्रातून सोमवार ते रविवार कोणतीही सुटी न घेता लसीकरण सुरू झाले आहे. तसेच तालुक्यातील २४ उपकेंद्रांवरही आठवड्यातून एक दिवस लसीकरण होणार आहे. यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आरोग्य विभागाच्यावतीने आवाहन करण्यात आले आहे.
कोट:
सद्यस्थितीत तालुक्यात ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रातून ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी सोमवार ते रविवारअखेर संपूर्ण आठवडाभर लसीकरण होत आहे. याचबरोबर प्राथमिक उपकेंद्रांवरही आठवड्यातून एकदा लसीकरण केले जाणार आहे. यामध्ये तांत्रिक मदतीकरिता उपकेंद्र असणाऱ्या गावातील प्राथमिक शिक्षकांची मदत होणार आहे. प्रत्येक गावात ही मोहीम राबवली जाणार असून नागरिकांनी लसीकरणासाठी सहकार्य करावे.
- डॉ. भगवान मोहिते
जावळी तालुका वैद्यकीय अधिकारी