कोरोनाचा खर्च, नामांतराचा विषय गाजणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:16 IST2021-02-05T09:16:43+5:302021-02-05T09:16:43+5:30
सातारा : तब्बल वर्षभरानंतर सातारा पालिकेच्या सर्वसाधारण सभेला मुहूर्त मिळाला असून, बुधवारी (दि. ३) होणाऱ्या ऑनलाइन सभेकडे सर्वांचेच ...

कोरोनाचा खर्च, नामांतराचा विषय गाजणार
सातारा : तब्बल वर्षभरानंतर सातारा पालिकेच्या सर्वसाधारण सभेला मुहूर्त मिळाला असून, बुधवारी (दि. ३) होणाऱ्या ऑनलाइन सभेकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. सभेत कोरोना प्रतिबंधासाठी केलेला कोट्यवधींचा खर्च तसेच चांदणी चौकाच्या नामकरणाच्या विषयावरून खडाजंगी होण्याची चिन्हे आहेत.
पालिकेची शेवटची सर्वसाधारण सभा १२ फेब्रुवारी २०२० रोजी पार पडली. यानंतर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू झालेल्या लॉकडाऊनमुळे सभा, बैठकांवर राज्य शासनाकडून निर्बंध घालण्यात आले. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर हे निर्बंधही उठविण्यात आले. मात्र, पालिकेच्या सभेला मुहूर्तच मिळत नव्हता. अखेर वर्षभरानंतर का होईना सभेची तारीख जाहीर झाल्याने नगरसेवकांना मोठा दिलासा मिळाला. प्रशासनाने बुधवार, ३ फेब्रुवारी रोजी ऑनलाइन सभा बोलाविली आहे.
या सभेच्या अजेंड्यावर शहर विकासाचे ४२ विषय असले तरी उपविषयांचा भरणाही अधिक आहे. पालिका प्रशासनाने कोरोना प्रतिबंधावर यंदा कोट्यवधींचा खर्च केला आहे. या खर्चाच्या विषयावर सत्ताधारी व विरोधी नगरसेवक आक्रमक भूमिका घेऊ शकतात. शिवाय गेल्या अनेक वर्षांपासूनची जुनी ओळख असलेल्या चांदणी चौकाच्या नाककरणाचा विषयही अजेंड्यावर घेण्यात आला आहे. या विषयावरूनही सभेत वादंग पेटण्याची चिन्हे आहेत. हद्दवाढीतील ग्रामपंचायतींमधून जमा होणारा महसूल ग्रामपंचायत हद्दीत खर्च करणे, ग्रेड सेपरेटरला महापुरुषांचे नाव देणे, अजिंक्यतारा किल्ल्याकडे जाणाऱ्या मार्गावर विद्युतीकरण करणे, लाड व पागे समितीच्या शिफारशीनुसार सफाई कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरणे, सातारा शहर व हद्दीतील खुल्या जागा, रस्ता, दुभाजक यांचे सुशोभीकरण करणे, सोनगाव डेपोत मैल्यापासून खतनिर्मिती प्रकल्प उभारणे तसेच शहरातील व्यावसायिकांना घरपट्टीत तीन महिने सूट देणे असे विषय अजेंड्यावर घेण्यात आले आहेत.
लोगो : सातारा पालिका फोटो