कोरोनाबाधित रुग्णांचा गावात बिनधास्त वावर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:27 IST2021-06-05T04:27:20+5:302021-06-05T04:27:20+5:30

कुसूर : कऱ्हाड तालुक्यातील कोळे विभागात कोरोनाबाधित रुग्ण होम आयसोलेशन असतानाही बिनधास्त गावातून फिरताना दिसत आहेत. बाधितांचे नाव आरोग्य ...

Coronary patients in the village without any worries! | कोरोनाबाधित रुग्णांचा गावात बिनधास्त वावर!

कोरोनाबाधित रुग्णांचा गावात बिनधास्त वावर!

कुसूर : कऱ्हाड तालुक्यातील कोळे विभागात कोरोनाबाधित रुग्ण होम आयसोलेशन असतानाही बिनधास्त गावातून फिरताना दिसत आहेत. बाधितांचे नाव आरोग्य विभागाकडून गोपनीय ठेवण्यात येत असल्याने नेमके बाधित कोण हे ओळखणे लोकांना कठीण झाले आहे. परिणामी बाधितांच्या संपर्कात आल्याने ग्रामीण भागात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे कोरोनाची साखळी खंडित करणे प्रशासनासमोर आव्हान आहे.

सातारा जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या शहरांच्या तुलनेत ग्रामीण भागामध्ये जास्त प्रमाणात दिसू लागली आहे. बाधितांचा आकडा कमी करण्यासाठी प्रशासनाकडून कडक लॉकडाऊन अवलंबून शहरांमधील संख्या कमी करण्यास यश आले आहे. मात्र, ग्रामीण भागात प्रशासनाचे पुरते दुर्लक्ष झाल्याचे परिणाम म्हणूनच गावागावांतून दररोज रुग्ण वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे. ग्रामीण भागात शेती मुख्य व्यवसाय असल्याने सध्या शेतीची कामे वेगाने सुरू आहेत. त्यासाठी बरीच शिथिलता दिली गेले आहे. किंबहुना खरीप हंगामासाठी शिथिलता असणे आवश्यक आहे. मात्र, या शिथिलतेचा कोरोना पॉझिटिव्ह असलेले रुग्ण गैरफायदा उठवत असल्याचे दिसून येत आहे. कोरोना पॉझिटिव्ह असणारे रुग्ण घर सोडून बाहेर फिरताना दिसत आहेत. प्रत्येक गावात हीच परिस्थिती आहे. युवक वर्गाला कोणतेही गांभीर्य दिसून येत नाही. दुचाकीवरून विनाकारण प्रवास करत आहेत.

(चौकट)

बाधितांची नावे सोशल मीडियावर टाका..

ग्रामीण भागात बाधित रुग्ण गावातून बिनधास्त फिरत असल्याने नेमके बाधित कोण हे लवकर लक्षात येत नाही. परिणामी गावोगावी असणाऱ्या व्हाॅट्सअॅप ग्रुपवर गावच्या रुग्णांची यादी प्रसारित करण्याची परवानगी प्रशासनाने देणे गरजेचे आहे. कोरोनाबाधित रुग्णांची नावे गोपनीय ठेवण्याचे धोरण प्रशासनाने अवलंबले असल्याने ग्रामीण भागात रुग्णवाढ होण्यासाठी कारणीभूत ठरत आहे.

(चौकट)

वाड्या-वस्त्यांवर कोरोनाचा विळखा..

आरोग्य यंत्रणेकडून प्रत्येक गावच्या दक्षता कमिटी, सरपंच, पोलीस पाटील यांना या रुग्णांची माहिती दिली जाते; परंतु ती गोपनीय असल्याकारणाने सार्वजनिक करता येत नाही. त्यामुळे पॉझिटिव्ह रुग्ण इतर लोकांच्या लक्षात येत नाहीत. एखाद्या वस्तीवर रुग्ण सापडला तर गोपनीय कारणामुळे शेजारी राहणाऱ्या कुटुंबांनाही समजत नाही. शिवाय रुग्णही आपण बाधित आहोत, त्याचं गांभीर्य बाळगत नाहीत. परिणामी ग्रामीण भागामध्ये वाड्या-वस्त्यावर रुग्णांमध्ये कमालीची वाढ होत आहे. तरी प्रशासनाने ग्रामीण भागाकडे आपला मोर्चा वळवावा, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांमधून होत आहे.

Web Title: Coronary patients in the village without any worries!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.