सातारा तालुक्यात कोरोनाची लाट ओसरली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:41 IST2021-09-18T04:41:54+5:302021-09-18T04:41:54+5:30
सातारा : सातारा तालुक्यात रुग्णसंख्या आटोक्यात येत असून सध्या सक्रिय रुग्णसंख्या ७४९ एवढी आहे. यामध्ये ग्रामीण भागात ३४६, शहरी ...

सातारा तालुक्यात कोरोनाची लाट ओसरली
सातारा : सातारा तालुक्यात रुग्णसंख्या आटोक्यात येत असून सध्या सक्रिय रुग्णसंख्या ७४९ एवढी आहे. यामध्ये ग्रामीण भागात ३४६, शहरी भागात ३३५, होम आयसोलेट ८९, कोरोना सेंटरमध्ये ५४९, प्रत्यक्ष हॉस्पिटलमध्ये ८२ रुग्ण उपचार घेत असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. डी.एच. पवार यांनी दिली.
सातारा जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांपासून सुरू झालेला कोरोना संसर्ग आजही सुरूच आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक नवे उच्चांक पाहायला मिळाले. सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आला आहे. बाधित आकडा ३०० ते ४०० च्या घरात असला तरी मृत्यू अधूनमधून वाढत आहेत.
दुसऱ्या लाटेत हॉटस्पॉट ठरलेल्या सातारा तालुक्यातही आकडा आटोक्यात आला आहे.
सातारा तालुक्यात ३ लाख ९८ हजार ५९५ जणांची कोरोना चाचणी झाली आहे. त्यापैकी ३ लाख ५४ हजार १८ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला तर बाधितांची एकूण संख्या ५० हजार ४४२ एवढी आहे. त्यापैकी ४८ हजार ६७७ जणांनी कोरोनावर मात करत लढाई जिंकलीय. साताऱ्याचा रिकव्हरी रेट ९६.२७ टक्के एवढा आहे.
तालुक्यात आजपर्यंत १ हजार ४५५ जणांचा मृत्यू झाला असून ग्रामीण भागात ७४२, शहरी भागात ५०३ तर जिल्ह्याबाहेरील २०८ जणांचा समावेश यात आहे. आजमितीस ७४९ ॲक्टिव्ह रुग्णसंख्या आहे. मात्र, त्यापैकी ८९ रुग्ण होम आयसोलेट असून ५४९ हे संस्थात्मक विलगीकरण व ग्रामीण भागात सोय करण्यात आलेल्या आयसोलेशन सेंटरमध्ये आहेत. कोरोना केअर सेंटरमध्ये २९४ रुग्ण दाखल आहेत. प्रत्यक्ष हॉस्पिटलमध्ये फक्त ८२ रुग्ण उपचार घेत आहेत.