कोरोना प्रतिबंध करण्यासाठी आलेली लस सर्वाधिक सुरक्षित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:18 IST2021-02-05T09:18:36+5:302021-02-05T09:18:36+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मायणी : कोरोना विषाणूंशी लढण्यासाठी तयार करण्यात आलेली लस पूर्ण सुरक्षित असून सामान्य नागरिकांनीही न घाबरता ...

कोरोना प्रतिबंध करण्यासाठी आलेली लस सर्वाधिक सुरक्षित
लोकमत न्यूज नेटवर्क
मायणी : कोरोना विषाणूंशी लढण्यासाठी तयार करण्यात आलेली लस पूर्ण सुरक्षित असून सामान्य नागरिकांनीही न घाबरता लस घ्यावी. ही लस पूर्ण सुरक्षित असून अफवांवर विश्वास ठेवू नका, असे प्रतिपादन आमदार जयकुमार गोरे यांनी केले.
खटाव तालुक्यातील आरोग्य कर्मचारी व सर्वसामान्य नागरिक यांच्यासाठी देण्यात येणाऱ्या ‘कोविड-१९’ लसीकरणाचा शुभारंभ येथील श्री छत्रपती शिवाजी एज्युकेशन सोसायटीच्या मेडिकल कॉलेजमध्ये झाला. यावेळी गटविकास अधिकारी रमेश काळे, तालुका वैद्यकीय अधिकारी युनूस शेख, खटाव पंचायत समितीच्या सभापती जयश्री कदम, मेडिकल कॉलेजचे संस्थापक डॉक्टर एम. आर. देशमुख, सचिव सोनिया गोरे, पंचायत समिती सदस्या सिंधुताई घार्गे, डॉक्टर सागर खाडे डॉक्टर, सचिन चव्हाण , संदीप देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.
मागील आठवड्यामध्ये संपूर्ण देशामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तयार करण्यात आलेल्या ‘कोव्हिशिल्ड’ (कोविड-१९) या लसीचा शुभारंभ करण्यात आला. खटाव तालुक्यामध्येही गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या या लसीकरण मोहिमेचा सोमवारी शुभारंभ झाला. पहिल्या टप्प्यामध्ये खटाव तालुक्यातील वैद्यकीय क्षेत्रात व अतिमहत्त्वाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या सोळाशे कर्मचाऱ्यांना ही लस रोज दोनशे कर्मचाऱ्यांच्या प्रमाणातदेण्यात येणार आहे.
आमदार गोरे म्हणाले, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या सहकार्याने मायणी मेडिकल कॉलेजवर कोरोना केअर सेंटर व कोरोना हेल्थ सेंटर हॉस्पिटल उभारण्यात आले होते. या हॉस्पिटलचा ग्रामीण भागातील हजारो रुग्णांना लाभ झाला.
तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शेख यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये लसीकरणाचे महत्त्व पटवून देऊन कशी सुरक्षित व आरोग्यासाठी चांगली आहे याची माहिती दिली. खटाव तालुक्यातील पहिली कोविड १९ लस आरोग्य सेवक प्रवीण देशमुखे यांना आरोग्य सेविका पुष्प इंदुरकर व मनीषा भिसे यांनी दिली. यावेळी तालुक्यातील वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करणारे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी, मेडिकल कॉलेज पदाधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होता.
फोटो ओळी :
(खटाव तालुक्यातील कोविड १९ या लसीकरण मोहिमेच्या शुभारंभ प्रसंगी आमदार जयकुमार गोरे, गटविकास अधिकारी रमेश काळे, वैद्यकीय अधिकारी इनुस शेख, डॉक्टर एम आर देशमुख व मान्यवर.... संदीप कुंभार)