ग्रामीण भागातील कोरोना उपचार केंद्र वरदान : रामराजे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:40 IST2021-05-23T04:40:04+5:302021-05-23T04:40:04+5:30
फलटण : ‘फलटण तालुक्याच्या ग्रामीण भागातील वाढती कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी ग्रामीण भागामध्ये सुरू केलेली कोरोना उपचार केंद्र व ...

ग्रामीण भागातील कोरोना उपचार केंद्र वरदान : रामराजे
फलटण : ‘फलटण तालुक्याच्या ग्रामीण भागातील वाढती कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी ग्रामीण भागामध्ये सुरू केलेली कोरोना उपचार केंद्र व विलगीकरण कक्ष रुग्णांसाठी वरदान ठरणार आहेत. ग्रामस्थांनी त्याचा उपयोग करून आपल्या गावातून कोरोना हद्दपार करावा,’ असे आवाहन विधान परिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी केले आहे.
फलटण तालुक्याच्या पूर्व भागात साठे फाटा येथील लक्ष्मी नारायण लॉन्स मंगल कार्यालयात सुरू केलेल्या १११ बेडच्या रामराजे नाईक निंबाळकर कोविड विलगीकरण कक्षाचे उद्घाटन रामराजे नाईक-निंबाळकर यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार दीपक चव्हाण, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, फलटण पंचायत समिती सभापती शिवरूपराजे निंबाळकर-खर्डेकर, उपसभापती रेखाताई खरात, तहसीलदार समीर यादव, गटविकास अधिकारी डॉ. अमिता गावडे-पवार, सरपंच राजश्री माने, हनुमंतवाडीचे सरपंच विक्रमसिंह जाधव, मनोज गावडे, खटकेवस्तीचे सरपंच बापूराव गावडे, श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक संतोष खटके, दत्तात्रय शेंडे उपस्थित होते.
रामराजे म्हणाले, ‘कोरोनाची परिस्थिती भयानक झाली असताना, ग्रामीण भागात उभी राहत असलेली सुसज्ज कोरोना केअर सेंटर उपयुक्त ठरत आहेत. रुग्णांची सेवा करण्यासाठी या माध्यमातून तालुक्यातील अनेक दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन शक्य ती मदत व सहकार्य येथील लोकांना करावे. कोरोनापाठोपाठ म्युकरमायकोसिसचा सामना करावा लागणार आहे. आपण राज्य शासनाच्या माध्यमातून कोरोना रुग्णांसाठी लागणाऱ्या सर्व सेवा-सुविधा प्राधान्याने उपलब्ध करून देण्यासाठी कार्यरत आहेत. यापुढील काळात फलटण तालुक्यातील कोणत्याही ग्रामस्थांना कोरोनाबाबतीत काही अडचण असल्यास संपर्क साधा.’
संजीवराजे म्हणाले, ‘फलटण तालुक्यातील जनतेने कोरोनाच्या या लढाईत आपली व कुटुंबाची काळजी घेण्यासाठी सर्व नियम निकषांचे काटेकोर पालन करावे. कोरोनावर मात करण्यासाठी शासन आणि आम्ही सर्वजण जनतेच्या पाठीशी आहोत. आवश्यक उपचार, साधने, सुविधा कमी पडू देणार नाही.’