आधी कोरोना चाचणीए मगच व्यवसायाला परवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:41 IST2021-03-23T04:41:28+5:302021-03-23T04:41:28+5:30
सातारा : कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी पालिका प्रशासनाने ठोस पावले उचलली आहेत. त्यानुसार शहरातील सर्व हातगाडीधारक, व्यापारी व विक्रेत्यांना कोरोना ...

आधी कोरोना चाचणीए मगच व्यवसायाला परवानगी
सातारा : कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी पालिका प्रशासनाने ठोस पावले उचलली आहेत. त्यानुसार शहरातील सर्व हातगाडीधारक, व्यापारी व विक्रेत्यांना कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. जे विक्रेते चाचणी करणार नाहीत अशांना व्यवसायास परवानगी दिली जाणार नाही, असे आदेशही प्रशासनाने दिले आहेत. कोरोना चाचणीस प्रारंभ झाला असून दोन दिवसात सुमारे साडेतीनशे विक्रेत्यांचे स्वॅब घेण्यात आले.
जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे प्रशासनाच्या चिंतेत भर पडत चालली आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. नागरिकांमध्ये सातत्याने जागृती करत आहे. आता पालिका प्रशासनाने शहरातील सर्व व्यापारी, विक्रेते, हातगाडीधारक व कर्मचाऱ्यांना कोरोना चाचणी बंधनकारक केली आहे.
पालिकेचे कस्तुरबा रुग्णालय व गोडोली येथील प्राथमिक नागरिक आरोग्य सेवा केंद्राच्या माध्यमातून सेवन स्टार इमारतीत शिबिर घेण्यात येत आहे. या शिबिरात विक्रेते, व्यापाऱ्यांचे स्वॅब तपासणीसाठी घेतले जात आहेत. दोन दिवसात सुमारे साडेतीनशे हातगाडीधारक व व्यापाऱ्यांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले. जे विक्रेते, व्यापारी चाचणी करून घेणार नाहीत अशांना कोणत्याही परिस्थितीत व्यवसायास परवानगी दिली जाणार नाही. त्यामुळे संबंधितांनी प्राधान्याने चाचणी करावी, असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
(चौकट)
गांधी मैदान चौपाटीही बंद...
खासदार उदयनराजे भोसले यांनी तब्बल १० महिन्यानंतर गांधी मैदानावर चौपाटी सुरू करण्यास परवानगी दिली. तत्पूर्वी येथील जवळपास ७५ विक्रेत्यांनी कस्तुरबा रुग्णालयात कोरोना चाचणी केली आहे. या चाचणीचा अहवाल मंगळवारी प्राप्त होणार आहे. तोपर्यंत विक्रेत्यांकडून चौपाटी सुरू न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ज्यांचे नमुने निगेटिव्ह येतील असे विक्रेते आपला व्यवसाय शासन नियमांचे पालन करून सुरू करणार आहेत.
(कोट)
कोरोनाचे संक्रमण रोखणे हे आपल्याच हातात आहे. त्यामुळे सर्वधर्मीय सुशिक्षित बेरोजगार हॉकर्स संघटना व पालिकेच्या माध्यमातून व्यापाऱ्यांची कोरोना तपासणी केली जात आहे. प्रत्येकाने ही चाचणी करून घ्यावी. चाचणी न केल्यास व्यवसायास परवानगी दिली जाणार नाही, याची नोंद घ्यावी.
- संजय पवार, शहराध्यक्ष
हॉकर्स संघटना