कोरोनाग्रस्तच घेताहेत कोरोनाग्रस्तांची काळजी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:30 IST2021-06-04T04:30:01+5:302021-06-04T04:30:01+5:30
खंडाळा : कोरोनासारख्या विषाणूचा खंडाळा तालुक्यातील अहिरे गावात प्रसार वाढू लागला आहे. कोरानाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांची संख्या वाढत आहे. ...

कोरोनाग्रस्तच घेताहेत कोरोनाग्रस्तांची काळजी!
खंडाळा : कोरोनासारख्या विषाणूचा खंडाळा तालुक्यातील अहिरे गावात प्रसार वाढू लागला आहे. कोरानाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोनाच्या विळख्यातून गावाला बाहेर काढण्यासाठी ग्रामपंचायत व आपत्ती व्यवस्थापन समितीने गावासाठी सुरू केलेल्या विलगीकरण कक्षात रुग्णांना सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यातच या कक्षात कोरोनाग्रस्त रुग्णच इतर रुग्णांचे योगासने, प्राणायाम असे व्यायाम घेऊन काळजी घेत आहेत. हा उपक्रम इतरांना दिशादर्शक ठरत आहे.
तालुक्यात कोरोनाविरुद्धचा लढा आणखी मजबूत करण्यासाठी आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करणे आवश्यक आहे. ही गरज ओळखून आपल्या गावातील लोकांची काळजी घेण्यासाठी वैद्यकीय विभागाच्या सहकार्याने अहिरे ग्रामपंचायत व व्यवस्थापन समितीने प्राथमिक शाळेत स्वतंत्र विलगीकरण कक्ष स्थापन केला आहे. कोरोनाची साखळी तुटावी, यासाठी अल्प लक्षणे असलेल्या रुग्णांची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे.
या विलगीकरण कक्षाचा प्रारंभ मिलिंद पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी जिल्हा परिषद सदस्य मनोज पवार, उपसभापती वंदना धायगुडे, गटविकास अधिकारी माणिकराव बिचकुले, माजी सभापती रमेश धायगुडे, पोलीस निरीक्षक महेश इंगळे, युवा उद्योजक नितीन ओव्हाळ, आरोग्य अधिकारी डॉ. पडळकर, सरपंच रवींद्र सोनवणे, उपसरपंच दयानंद धायगुडे, विशाल धायगुडे, मोहन धायगुडे, ग्रामविकास अधिकारी मल्हारी शेळके, सर्व ग्रामपंचायत सदस्य, तलाठी उपस्थित होते.
चाैकट..
योगसनांचे प्रात्यक्षिक...
या विलगीकरण कक्षात रोज सकाळी योगासने, प्राणायाम व इतर पूरक व्यायाम रुग्णांकडून करून घेतले जात आहेत. तेसुद्धा कोरोनाग्रस्तच इतर रुग्णांना याचे धडे देत आहेत. त्यामुळे प्रसन्न वातावरणात कोरोनावर मात करण्यासाठी ही कार्यप्रणाली उपयोगी पडत आहे. शिवाय दिवसभर रुग्णांचे मन प्रसन्न राहत आहे. नकारात्मक विचारांना तिलांजली मिळाल्याने प्रकृतीत सुधारणा होण्यास मदत होत आहे.
कोट...
गावात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्याला आळा घालण्यासाठी गावपातळीवर सर्व प्रयत्न सुरू आहेत. विलगीकरण कक्षात लोकांना सर्व सुविधा पुरविल्या आहेत. लोकांनी कोणतीही भीती न बाळगता या परिस्थितीचा सामना केला पाहिजे.
-रवींद्र सोनवणे, सरपंच
०३खंडाळा
अहिरे (ता. खंडाळा) येथे विलगीकरण कक्षात कोरोनाग्रस्त रुग्ण योगासने, प्राणायाम असे व्यायाम घेऊन काळजी घेत आहेत. हा उपक्रम इतरांना दिशादर्शक ठरत आहे.