ग्रामीण रुग्णालयातून कोरोनाग्रस्त रुग्णाचे पलायन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:39 IST2021-04-20T04:39:21+5:302021-04-20T04:39:21+5:30
फलटण : ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयातून एका ज्येष्ठ कोरोना बाधित रुग्णाने पलायन केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. दोनच दिवसांपूर्वी आमदार ...

ग्रामीण रुग्णालयातून कोरोनाग्रस्त रुग्णाचे पलायन!
फलटण : ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयातून एका ज्येष्ठ कोरोना बाधित रुग्णाने पलायन केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. दोनच दिवसांपूर्वी आमदार दीपक चव्हाण यांनी उपजिल्हा रुग्णालयाने कारभार सुधारावा, असे फटकारले असतानाच हा गंभीर प्रकार घडल्याने येथील गचाळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. या निमित्ताने प्रांताधिकारी शिवाजीराव जगताप दोषींवर कारवाई करणार का? असा सवाल व्यक्त होत आहे.
फलटण शहराचे उपनगर म्हणून ओळख असलेल्या कोळकी येथील मालोजीनगर भागात एका दुकानाच्या कट्ट्यावर संबंधित बाधित व्यक्ती येऊन बसली.
त्यावेळी तिथे बसलेल्या पत्रकारांनी त्यांची चौकशी केली असता त्यांनी वेगवेगळी उत्तरे दिली. त्यांच्या हाताला सलाईनची पट्टी दिसून आल्याने त्यांची अधिक चौकशी केली असता त्यांनी आपण जिंती (ता. फलटण )येथील असल्याचे सांगितले. त्याचवेळी कोळकी गणाचे पंचायत समिती सदस्य सचिन रणवरे हे तिथे आले व त्यांनी जिंती येथे चौकशी केली असता संबंधित ज्येष्ठ व्यक्ती जिंती येथीलच असून, संबंधित व्यक्ती कोरोना बाधित असून, ती फलटण शहरातील उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल असल्याचे त्यांच्या नातेवाइकांकडून त्यांना सांगण्यात आले. यानंतर उपस्थित पत्रकारांनी या प्रकाराची माहिती प्रांताधिकारी शिवाजीराव जगताप, पोलीस निरीक्षक भारत किंद्रे व मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांना दिली. यानंतर पोलीस तातडीने घटनास्थळी हजर झाले. यानंतर नगरपरिषदेने पाठविलेल्या रुग्णवाहिकेमधून त्यांना पुन्हा ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. परंतु तेथे संबंधित व्यक्तीस आतमध्ये घेण्यास नकार दिल्याचे सांगण्यात आले. तेव्हा प्रांताधिकारी शिवाजीराव जगताप यांनी फोन करताच त्यांना दाखल करून घेण्यात आले.
कोळकी येथील पोलीस गाडी, रुग्णवाहिका सायरन वाजवित आल्याने या परिसरात काहीकाळ नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण होते. परंतु वस्तुस्थिती समजताच ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयाच्या कारभाराबाबत ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला.
चौकट..
लोकप्रतिनिधींना लक्ष घालण्याची मागणी..!
दोनच दिवसांपूर्वी कोरोना बाधित रुग्णांची हेळसांड खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी दिला होता. आमदार दीपक चव्हाण यांनी ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयाने आपला कारभार सुधारावा, अशा शब्दात फटकारले होते. त्यानंतर दोनच दिवसांत हा गंभीर प्रकार घडल्याने येथील गचाळ कारभार समोर आला आहे. त्यामुळे भविष्यात आणखीन गंभीर घटना घडण्यापूर्वीच लोकप्रतिनिधींनी यामध्ये लक्ष घालावे, अशी मागणी होत आहे.