आरोग्य केंद्रानंतर आता उपकेंद्रातही कोरोना डोस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:35 IST2021-04-05T04:35:53+5:302021-04-05T04:35:53+5:30
सातारा : जिल्ह्यात कोरोना लसीकरण करण्यात येत असून जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागांतर्गत आतापर्यंत प्राथमिक आरोग्य केंद्रात सुविधा उपलब्ध होती. ...

आरोग्य केंद्रानंतर आता उपकेंद्रातही कोरोना डोस
सातारा : जिल्ह्यात कोरोना लसीकरण करण्यात येत असून जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागांतर्गत आतापर्यंत प्राथमिक आरोग्य केंद्रात सुविधा उपलब्ध होती. पण, सोमवारपासून उपकेंद्रातही कोरोनाची लस देण्यात येणार आहे. यासाठी गावापातळीवरील लोकसहभागही घेण्यात येणार आहे. तर जिल्ह्याच्या आरोग्य विभागाच्या वतीने दररोज २० हजार लोकांना लसीकरण करण्याचे टार्गेट ठेवण्यात आले आहे.
जिल्ह्यात मागील वर्षापासून कोरोना विषाणूचे संकट आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ६७ हजार कोरोना बाधित आढळून आले आहेत. तर कोरोनामुळे १ हजार ९१८ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या ५ हजारांवर रुग्णांवर उपचार सुरू आहेत. देशात जानेवारीपासून कोरोना लसीकरण करण्यात येत आहे. साताऱ्यातही याच महिन्यात कोरोनाची लस देण्यास सुरुवात झाली. सुरुवातीला ४५ ते ५९ वर्षांमधील कोमॉरबीड नागरिक तसेच ६० वर्षांवरील ज्येष्ठांना लस देण्यास सुरुवात झाली. यासाठी जिल्ह्यातील काही शासकीय तसेच खासगी रुग्णालयात ही सुविधा होती. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातही सुविधा सुरू करण्यात आली. यामुळे ग्रामीण भागातील लोकांनाही याचा फायदा झाला. असे असतानाच आता जिल्हा परिषदेच्या आरोग्य उपकेंद्रातही सोमवारपासून कोरोना लसीकरण करण्यात येणार आहे. यामध्ये ४५ वर्षांवरील लोकांना लस देण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे.
जिल्ह्यात ४०१ आरोग्य उपकेंद्रे आहेत. सुरुवातीला यामधील ३२९ आरोग्य उपकेंद्रात कोरोना लसीकरण सुविधा सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी तालुकानिहाय नियोजन करण्यात आलेले आहे. तसेच आरोग्य उपकेंद्रातील लसीकरणासाठी तारीखही निश्चित करण्यात आली आहे. त्यादिवशीच कोरोनाची लस नागरिकांना मिळणार आहे. यासाठी गावातील लोकांचा, विविध समितींचाही सहभाग घेण्यात येणार आहे. यामुळे लोकांना कोरोना लसीसाठी फार दूरवर जावे लागणार नाही.
कोट :
जिल्ह्यातील आरोग्य केंद्रे आणि उपकेंद्रातही कोरोना लसीकरण सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. सोमवारपासून लसीकरण सुरू होईल. याबाबत सर्व नियोजन पूर्ण झालेले आहे. यासाठी प्रत्येक तालुक्याला एका नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच सरपंच, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि तंत्रस्नेही शिक्षकांचीही मदत घेण्यात येणार आहे.
- विनय गौडा, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद
फोटो दि.०४सातारा झेडपी नावाने...
फोटो ओळ : कऱ्हाड तालुक्यातील उंब्रज प्राथमिक आरोग्य केंद्रात मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी भेट देऊन कोरोना लसीकरणाबाबत माहिती घेतली.
............................................................