आईच्या मृत्यूनंतर चौथ्यादिवशी मुलाचा कोरोनाने मृत्यू!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:40 IST2021-04-20T04:40:34+5:302021-04-20T04:40:34+5:30
आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोयना विभागातील एका गावातील विवाहित युवक खासगी शिक्षण संस्थेमध्ये क्लार्क म्हणून नोकरीला होता. ६ एप्रिल ...

आईच्या मृत्यूनंतर चौथ्यादिवशी मुलाचा कोरोनाने मृत्यू!
आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोयना विभागातील एका गावातील विवाहित युवक खासगी शिक्षण संस्थेमध्ये क्लार्क म्हणून नोकरीला होता. ६ एप्रिल रोजी किरकोळ आजारी असल्याने संबंधित युवक रुग्णालयात उपचारासाठी गेला. त्यावेळी त्याची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यामध्ये तो बाधित आढळला. त्यानंतर त्याची आई, वडील व पत्नीचीही चाचणी करण्यात आली. सर्वांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले. त्यातच युवकाला त्रास वाढल्यामुळे ७ एप्रिल रोजी कऱ्हाडला उपचारासाठी दाखल करण्यात आले, तर आई, वडील आणि पत्नीवर घरीच उपचार सुरू होते.
१५ एप्रिल रोजी वृद्ध आई-वडिलांना त्रास जाणवू लागल्यामुळे आशा सेविकेने त्यांची ऑक्सिजन पातळी तपासून वैद्यकीय अधिकाऱ्यांना त्याबाबत माहिती दिली. त्यांनी घरी जाऊन ऑक्सिजन व इतर उपचार सुरू केले. पुढील उपचारासाठी रुग्णालयात हलविणे गरजेचे असल्यामुळे रुग्णवाहिका बोलावण्यात आली. मात्र, त्यादिवशी कोविडची रुग्णवाहिका दिवसभर वाट पाहूनही उपलब्ध होऊ शकली नाही. ही बाब तहसीलदार योगेश टोम्पे यांना समजल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी गटविकास अधिकारी मीना साळुंखे व तालुका आरोग्य अधिकारी आर. बी. पाटील यांना सूचना देऊन तातडीने रुग्णवाहिका उपलब्ध केली. वयोवृद्ध दांपत्याला तातडीने कऱ्हाडला हलविण्यात आले. मात्र, वाटेतच आईचा मृत्यू झाला, तर वडिलांवर अद्यापही रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, सोमवार, दि. १९ रोजी कऱ्हाडमध्ये उपचार घेत असलेल्या क्लार्क असलेल्या युवकाचाही मृत्यू झाला. आईच्या मृत्यूनंतर चौथ्याच दिवशी मुलाचा मृत्यू झाल्याचे समजताच गावात हळहळ व्यक्त करण्यात आली.