कोरोनामुळे सर्वांना ऑक्सिजनचे महत्व पटले : सयाजी शिंदे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:10 IST2021-02-05T09:10:15+5:302021-02-05T09:10:15+5:30
सातारा वृक्षारोपण व त्याचे संवर्धन ही काळाची गरज आहे. तसेच कोरोनामुळे सर्वांना ऑक्सिजनचे महत्व पटले असून, विनामूल्य ऑक्सिजन देणाऱ्या ...

कोरोनामुळे सर्वांना ऑक्सिजनचे महत्व पटले : सयाजी शिंदे
सातारा
वृक्षारोपण व त्याचे संवर्धन ही काळाची गरज आहे. तसेच कोरोनामुळे सर्वांना ऑक्सिजनचे महत्व पटले असून, विनामूल्य ऑक्सिजन देणाऱ्या वृक्षांची लागवड व त्यांचे संवर्धन करण्याचे काम सह्याद्री देवराईच्या माध्यमातून चालू आहे, असे मत अभिनेते सयाजी शिंदे यांनी व्यक्त केले.
सह्याद्री देवराई व सातारा पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने साकारण्यात येणाऱ्या जैवविविधता उद्यानात प्रजासत्ताक
दिनानिमित्त पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी प्रसिध्द अभिनेते व
सह्याद्री देवराईचे अध्यक्ष सयाजी शिंदे, पोलीस उपअधीक्षक(गृह) राजेंद्र साळुंखे, मधुकर फल्ले, विजयकुमार निंबाळकर, क्रीडाई साताराचे बाळासाहेब ठक्कर, सागर साळुंखे उपस्थित होते.
या उपक्रमांत सातारा पोलीस दलानेदेखील सहभाग घेतला असल्याचे पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी सांगितले. याप्रसंगी मान्यवरांनी जैवविविधता उद्यानाच्या चालू असलेल्या कामांची पाहणी केली. तसेच कर्मवीर भाऊराव पाटील इंजिनीयरिंग कॉलेजच्या स्थापत्य अभियांत्रिकीच्या विध्यार्थ्यांच्या श्रमदानातून चालू असलेल्या जलसंधारणाच्या कामाची पाहणी केली, सदर कामाची माहिती प्रा. स्वाती जगदाळे यांनी दिली.
पुणे - बंगळुरू राष्ट्रीय महामार्गालगतच्या म्हसवे येथील पोलीस दलाच्या फायरिंग रेंजच्या जागेमध्ये सुमारे ३०
एकर जागेमध्ये सह्याद्री देवराई व पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने जैवविविधता उद्यान उभे राहात आहे. हे उद्यान राज्यासाठी नव्हे; तर देशासाठी पथदर्शी ठरेल, असा विश्वास सह्याद्री देवराईचे प्रणेते सयाजी शिंदे यांनी व्यक्त केला.