साताऱ्यातील कोरोना सेंटर होऊ लागलीत हाऊसफुल्ल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:42 IST2021-03-23T04:42:08+5:302021-03-23T04:42:08+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असून, सातारा शहरात सुरू असलेली दोन कोरोना सेंटर हाऊसफु्ल्ल ...

साताऱ्यातील कोरोना सेंटर होऊ लागलीत हाऊसफुल्ल
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असून, सातारा शहरात सुरू असलेली दोन कोरोना सेंटर हाऊसफु्ल्ल होऊ लागली आहेत. गतवर्षीसारखी यंदा परिस्थिती होते की काय, अशी चिंता आरोग्य विभागाला लागली असून, कोरोनाची ही दुसरी लाट रोखण्यासाठी वैद्यकीय पथक सज्ज ठेवण्यात आले आहे.
जिल्ह्यात महिन्याभरापासून कोरोनाची रुग्णसंख्या दिवसाला तीनशेहून अधिक येत आहे. त्यामुळे रिकामी झालेली कोरोना सेंटर पुन्हा हाऊसफुल्ल होऊ लागली आहेत. हा आकडा असाच वाढत गेला, तर बंद पडलेली कोरोना सेंटर पुन्हा सुरू करण्याच्या हालचाली आरोग्य विभागाकडून सुरू झाल्या आहेत. गतवर्षी जिल्ह्यात तब्बल ३२ कोरोना सेंटर सुरू करण्यात आली होती. या सर्व कोरोना सेंटरमध्ये रुग्णांना उपचारासाठी जागा उपलब्ध होत नव्हती. काहीजणांना बेड उपलब्ध न झाल्याने जमिनीवर उपचार करावे लागले होते. आता यंदाही हीच परिस्थिती उद्भवते की काय, अशी चिन्हे दिसू लागली आहेत. महिन्याभरात दिवसाकाठी ३०० रुग्ण आढळून येऊ लागल्याने जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले आहे.
सध्या सातारा शहरामध्ये जम्बो कोरोना सेंटर आणि जिल्हा शासकीय रुग्णालयातील कोरोना सेंटर ही दोनच सेंटर सुरू आहेत. त्यामुळे या दोन सेंटरवरच सध्या सर्व रुग्णांचा भार आहे.
गतवर्षी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये बाधित रुग्णांवर उपचार केले जात नव्हते. मात्र यंदा याऊलट परिस्थिती असल्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये ही उपचारास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे सातारा शहरात असलेली कोरोना सेंटर गतवर्षीसारखी भरायची नाहीत, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. मात्र आरोग्य विभाग तर्कवितर्कावर अवलंबून न राहता दुसरी लाट रोखण्यासाठी पूर्णपणे सज्ज झाला असल्याचे पाहायला मिळत आहे. सर्व कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत.
चौकटः
जम्बो कोरोना सेंटरमधील बेडची क्षमता
२८८
सध्या रुग्ण संख्या
२०९
..........
जिल्हा रुग्णालय कोरोना सेंटर बेड क्षमता
२९४२
सध्या रुग्ण
१५६०