कोरोनामुळे ७०० वर्षांची परंपरा सलग दुसऱ्या वर्षी खंडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:26 IST2021-07-20T04:26:43+5:302021-07-20T04:26:43+5:30
लोणंद : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणारा श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षीही रद्द झाला. शेकडो वर्षांची ...

कोरोनामुळे ७०० वर्षांची परंपरा सलग दुसऱ्या वर्षी खंडित
लोणंद : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणारा श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षीही रद्द झाला. शेकडो वर्षांची परंपरा अखंडित राहावी, यासाठी आळंदीहून माऊलींच्या पादुका घेऊन बस पंढरपूरकडे रवाना झाली.
यावेळी ठिकठिकाणी रस्त्याच्या कडेला उभे राहून भक्तांनी माऊलींच्या पादुका घेऊन जाणाऱ्या फुलांनी सजवलेल्या शिवशाही बसलाच नमस्कार करत दर्शन घेतले.
पालखी सोहळ्याचे पुणे जिल्ह्यातील शेवटचे ठिकाण म्हणजे नीरा होय. नीरा नदी ओलांडली की पाडेगावपासून या पालखी सोहळ्याचा सातारा जिल्ह्यात प्रवेश होतो. मात्र, यावेळीही कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे सातशे वर्षांपासून असणारी नीरा नदीवरील माऊलींच्या पादुकांना स्नान घालण्याची परंपरा खंडित झाली. यावेळी पुणेकर माऊलींच्या सोहळ्याला निरोप देतात तर सातारा जिल्ह्यातील अधिकारी व राजकीय नेतेमंडळी माऊलींच्या स्वागतासाठी याच नीरा नदीच्या काठी उभे असतात. लाखो भाविकांचा, वारकऱ्यांचा टाळ-मृदंगाचा गजर, माऊलींचा जयघोष करत याठिकाणी माऊलींच्या पादुकांना नीरा स्नान घातले जाते. नीरा ते लोणंदपर्यंत संपूर्ण रस्त्यावर विठ्ठलाचा गजर करत ज्ञानोबा तुकाराम माऊलीचा जयघोष करत रस्ते वारकऱ्यांनी व त्यांच्या वाहनांनी तुडुंब भरलेले असतात.
मात्र, यंदा यातील काहीच दिसत नव्हते. माऊलींचा पालखी सोहळा हा नीरा नदीच्या लहान पुलावरून सातारा जिल्ह्यात प्रवेश करतो, तो पूलही आज निर्मनुष्य दिसत होता. यंदा माऊलींच्या पादुका एस. टी.ने पंढरपूरकडे रवाना झाल्याने नीरा स्नान, सातारा जिल्ह्यात माऊलींचे केले जाणारे स्वागत यांना भाविक मुकले आहेत.
लोणंद रेल्वे पुलावर भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. रस्त्यावर रांगोळी काढण्यात आली होती. वारकरी संप्रदायाने याठिकाणी सकाळी दहा वाजल्यापासून भजन, कीर्तन सुरू केले होते. अनेक नागरिकांनी पंढरपूरकडे रवाना होत पादुका असलेल्या बसवर फुलांची उधळण करत... माऊलींचा जयघोष करत दर्शन घेतले. लोणंद पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर यांनी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात ठेवला होता.
चौकट
श्री संत ज्ञानेश्वर माऊलींचे पहिले उभे रिंगण चांदोबाचा लिंब येथे पार पडते. पण यावेळी माऊलींच्या अश्वाविनाच हा पालखी सोहळा पार पडत असल्याने शेकडो वर्षांची चांदोबाचा लिंब येथील उभ्या रिंगणाची परंपराही सलग दुसऱ्या वर्षी खंडित झाली.
कोट
यंदा मात्र ना नीरा स्नान... ना भजन, कीर्तनाचा आनंद... ना चांदोबाचा लिंब येथील उभे रिंगण... हे सारे यंदा चुकलेच. म्हणूनच वारकऱ्यांच्या मनात हळहळ व्यक्त होत आहे. मात्र, वारकरी संप्रदायाने यावेळीही प्रशासनाला साथ देत हा सोहळा काही मोजक्याच मानकऱ्यांच्या उपस्थितीत पंढरपूरकडे रवाना केला.
- ह. भ. प. शंकर मर्दाने, लोणंद
सचिव, खंडाळा तालुका वारकरी संप्रदाय