वाई तालुक्यात कोरोना आटोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:29 IST2021-06-04T04:29:29+5:302021-06-04T04:29:29+5:30
वाई : एप्रिल, मेमध्ये कोरोनाचा कहर वाढला होता. रुग्णांना बेड, व्हेटिंलेटर, इंजेक्शनची कमी जाणवत असून, ...

वाई तालुक्यात कोरोना आटोक्यात
वाई : एप्रिल, मेमध्ये कोरोनाचा कहर वाढला होता. रुग्णांना बेड, व्हेटिंलेटर, इंजेक्शनची कमी जाणवत असून, उपलब्ध रुग्णांच्या नातेवाइकांची धावपळ होताना दिसत होती. कोरोनाच्या संकटामुळे एक वर्षापासून छोटे व्यावसायिक, शेतकरी, कष्टकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. अगोदरच आर्थिक संकटात असलेल्या नागरिकांना खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करणे सामान्य माणसाला आर्थिक अडचणीमुळे उपचार करणे कठीण होत आहे. आर्थिक खर्च सामान्यांच्या आवाक्याच्या बाहेर आहे. कोरोनाची दुसरी लाट असून, परिस्थिती हाताबाहेर जाते काय अशी परिस्थिती होती.
वाई शहर व तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या ही लक्षणीय वाढत होती. मे मध्ये दीडशे ते दोनशेच्या घरात गेलेली पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आवाक्यात येऊन पन्नासच्या आसपास येऊ लागल्यामुळे नागरिकांसह प्रशासनाला दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात अपेक्षित रुग्णसंख्या कमी होत नसून जिल्हा रेड झोनमध्ये गेल्याने चिंतेत भर पडली आहे. शेतकरी, मजूर, व्यापारी, असंघटित क्षेत्रात काम करणारे कामगार, महिलांची सततच्या लॉकडाऊनमुळे मोठी कोंडी होत आहे. पंधरा दिवसांपूर्वी वाई शहरात ७० ते ८० च्या घरात येणाऱ्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या गेली आठ दिवस दहाच्या आत येत असून, संपूर्ण शहर कंटेन्मेंट झोनमध्ये असल्यामुळे १५ एप्रिलपासून मेडिकल वगळून बँकांसह सर्व महत्त्वाच्या सेवा बंद आहेत. यामुळे व्यापाऱ्यांसह नागरिकांची आर्थिक कोंडी होत असून, सामान्य नागरिकांना आपल्या पदरी असणारी थोडी पुंजी बँकेत अडकल्यामुळे उपासमारीची वेळ येत आहे.
वाई तालुक्यात मे महिन्यात २९२७ रुग्ण सापडले असून, ४९२ रुग्ण उपचार घेत आहेत. तर महिन्याभरात ९२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अलीकडच्या आठवड्यात पन्नासच्या आसपास आकडेवारी येत असल्याने काहीशी समाधानकारक स्थिती आहे. राज्यासह देशात जानेवारी महिन्यात कोरोनाच्या लसीकरणाला सुरुवात केली. लसीकरणाचा पाहिला, दुसरा टप्पा होऊन आता तिसऱ्या टप्प्यातील लसीकरण चालू आहे. आतापर्यंत वाई तालुक्यात ४५ पेक्षा जास्त वयाच्या नागरिकांचे ४२ हजारांच्यावर लसीकरण झाले आहे. तरी शासनाने लसीकरण मोहिमेला गती देऊन नियमावलीचे पालन करून व्यवसाय सुरु करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी व्यापाऱ्यांनी प्रशासनाला निवेदनाद्वारे केली आहे.
(चौकट)
बँका, एटीएम बंद, व्यापारी अडचणीत..
१५ एप्रिलपासून बँका बंद असल्यामुळे व्यावसायिक, नागरिकांची अनेक कामे खोळंबली आहेत. बँका बंद, एटीएम मशीन ही अनेक वेळा बंद असल्यामुळे व्यावसायिकांना मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागत आहे. तरी वाई शहरातील बँका कोरोनाच्या नियमांचे पालन करून मर्यादित कर्मचाऱ्यावर चालू करून व्यावसायिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी व्यापारी व नागरिकांकडून करण्यात येत आहे.