कोरोनामुळे ग्रामपंचायतीच्या उत्पन्नावर परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:39 IST2021-04-01T04:39:54+5:302021-04-01T04:39:54+5:30
खटाव : मागील वर्षी ऐन मार्च एंडच्या शेवटच्या टप्प्यात कोरोना विषाणूचा संसर्ग थांबविण्यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आले. त्यामुळे सर्वत्र ...

कोरोनामुळे ग्रामपंचायतीच्या उत्पन्नावर परिणाम
खटाव : मागील वर्षी ऐन मार्च एंडच्या शेवटच्या टप्प्यात कोरोना विषाणूचा संसर्ग थांबविण्यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आले. त्यामुळे सर्वत्र व्यवसाय, व्यापार आणि जनजीवन ठप्प झाले होते आणि याचा गेल्या काही महिन्यांपासून ग्रामपंचायतीच्या करवसुलीवर परिणाम झाला आहे. त्यातच आठवडी बाजारही बंद असल्यामुळे ग्रामपंचायतीला मिळणाऱ्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे.
करवसुली होत नसल्यामुळे विकासकामांवर त्याचा परिणाम होताना दिसून येत आहे. आर्थिक वर्ष संपत आले आहे. या महिन्यात ग्रामपंचायतीच्या सरासरी पन्नास ते साठ टक्के कर वसुली होते. परंतु गेल्या वर्षी २०२० मध्ये ग्रामपंचायतची सर्व यंत्रणा करवसुलीऐवजी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कामाला लागली. परिणामी घरपट्टी, पाणीपट्टीसह इतरही वसुली ठप्प झाली. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांना पगार कोठून द्यावयाचा तसेच वीज बिल, पाणी बिल या मासिक खर्चासह एखाद्या आपत्तीच्या काळात गावातील करावयाची स्वच्छता, औषधे फवारणी ही कामे ग्रामपंचायतीच्या उत्पन्नातून करावी लागतात. त्याचसोबत विविध कामांच्या व योजनांच्या देखभाल-दुरुस्तीची कामे करावी लागतात.
गेल्या वर्षभरापासून करवसुली नसल्यामुळे सध्या ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांना घरोघरी जाऊन करवसुलीसाठी भेट द्यावी लागत आहे. करवसुली नसल्यामुळे ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांना पगारापासून वंचित राहावे लागत आहे. एकीकडे कोरोनाचे वाढते संकट उभे आहे; तर दुसरीकडे निधी नसल्यामुळे ग्रामपंचायतीचा कारभार या आर्थिक ओढाताणीत कसा चालवायचा, असा प्रश्न आता प्रत्येक ग्रामपंचायतीतील सरपंच, उपसरपंच व ग्रामविकास अधिकाऱ्यांना सतावत आहे.