भाग्यलक्ष्मीच्या कुशीत पिकांना तांब्याने पाणी
By Admin | Updated: July 15, 2015 21:17 IST2015-07-15T21:17:42+5:302015-07-15T21:17:42+5:30
\कोयना परिसरात पिकांची होरपळ : शेती वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची खांद्यावर घागर; तरवे वाळण्याची भीती

भाग्यलक्ष्मीच्या कुशीत पिकांना तांब्याने पाणी
राजेंद्र सावंत - मणदुरे -पावसाचे माहेरघर असणाऱ्या पाटण तालुक्यात पावसाने ओढ दिल्याने सिंचनक्षेत्र नसलेल्या कोरडवाहू क्षेत्रावर संकट ओढावले आहे. कडक उन्हामुळे पिकांनी माना टाकायला सुरुवात केली आहे. काही ठिकाणी डोक्यावर हंडा घेऊन तांब्यांने पाणी घालून पिके जगविण्यासाठी शेतकऱ्यांकडून धडपड दिसत आहे.
उन्हाळ्यात पडलेल्या वळवाने शेतकऱ्यांनी पाटण तालुक्यात मशागतीची कामे चांगल्या पद्धतीने उरकून घेतली होती. २ जूनपासून तालुक्यात मोसमी पावसाला सुरुवात झाली. पेरण्यांची कामे चांगल्या पद्धतीने होऊन पिकांची उगवणही जोमात झाली आहे. शेतकऱ्यांनी कोळपणीची कामेही उरकून घेतली आहेत. भांगलणीची कामेही अंतिम टप्प्यात आली आहेत. काही शेतकऱ्यांनी पिकांना खतांची मात्रा दिल्याने व सध्या पाऊस गायब झाल्याने पिकांनी माना टाकायला सुरुवात केली आहे.
पाटण तालुक्याच्या मोरणा, मणदुरे, कोयना विभागात लागणीच्या भातांची लागण मोठ्या प्रमाणात केली जात असते. त्यासाठी तृप्ती, आर चोवीस, तेलदौसा, आजरा आदी जातींच्या भाताची लागवड केली जात असते. शेतकऱ्यांनी त्यासाठी मशागती करून भाताचे तरवे केले आहेत. काही शेतकऱ्यांनी वाढीसाठी या तरव्यांवर खते विस्कटली आहेत. मात्र, सध्या पावसाने उघडीप दिली असून, उन्हाच्या झळा वाढू लागल्या आहेत. कोवळ्या पिकांना उन्हाच्या झळा सोसत नाहीत. पिकांनी आता माना टाकायला सुरुवात केली आहे.
या पावसाळ्यात सुरुवातीलाच कोयना परिसरात पंधरा दिवसांमध्ये विक्रमी १ हजार २०० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. परंतु ज्याठिकाणी डोंगर परिसरात सिंचनाची सोय नाही, त्याठिकाणी हे तरवे जगविण्यासाठी डोक्यावरून पाणी आणून पिकांना द्यावे लागत असल्याचे विदारक चित्र आहे. आणखी आठ दिवस अशीच पावसाने ओढ दिल्यास शेतकऱ्यांची हातची पिके वाया जाण्याची चिन्हे आहेत.
डोंगर कपारीतील गावात नाचणी हे महत्त्वाचे पीक आहे. या पिकावरच येथील शेतकऱ्यांचे जीवनमान अवलंबून असते; मात्र तरवे वाळत असल्यामुळे ते जगविण्यासाठी पाणी डोक्यावरून आणूनच तांब्याने ते तरव्यांवर शिंपडावे लागत आहे.
शेतकऱ्यांना मदत हवी...
पावसाने ओढ दिल्यामुळे आपत्कालीन व्यवस्थापन करण्यासाठी १ टक्का युरिया १० लिटर पाण्यात मिसळून त्याची फवारणी केल्यास पिके तग धरू शकतात. शेतकऱ्यांनी पिके वाचविण्यासाठी ही उपाययोजना करणे गरजेचे आहे.
- एस. एस. चव्हाण
कृषी सहायक, पाटण
कोणतेही पीक घ्यायचे असल्यास सामान्य शेतकऱ्याला अगोदर कर्जाचे ओझे घ्यावे लागते. आता पावसाने ओढ दिल्यामुळे पिके धोक्यात आली आहेत. तांब्याने पाणी देऊन किती दिवस ही पिके तग धरणार? शासनाने शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा.
- संजय शिंदे
शेतकरी, चिटेघर
कोयना धरणातील पाणीसाठा५०.९८ टीएमसी
कोयना विभागातील एकूण पाऊस१,२४३ सेमी
नवजा विभागातील एकूण पाऊस१,३५२ सेमी
महाबळेश्वर विभागातील एकूण पाऊस१,३५२ सेमी