आरोप करण्यापेक्षा सहकार्य करा...!
By Admin | Updated: August 15, 2014 00:20 IST2014-08-14T23:33:54+5:302014-08-15T00:20:06+5:30
हौतात्म्याला एक वर्ष...

आरोप करण्यापेक्षा सहकार्य करा...!
प्रगती जाधव-पाटील- सातारा
पोलीसही मनुष्यच आहेत. कुठल्याही गुन्ह्याचा तपास करण्यासाठी त्यांना प्रत्यक्षदर्शींची मदत लागते. डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणारतही नेमके हेच झाले. प्रत्यक्षदर्शींकडून माहिती कमी मिळाल्यामुळेच पोलीस यंत्रणा हत्येचे सूत्रधार सापडले नाहीत, असे निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांना वाटते.
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येमागचे सूत्रधार अद्याप सापडले नाहीत. याविषयावरून पोलिसांवर चहुबाजूने ताशेरे ओढले जात आहेत. या पार्श्वभूमीवर निवृत्त पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आपली मते मांडली आहेत.
गुन्ह्यांची संख्या वाढली की सरसकट पोलिसांवर आरोप केला जातो. कोणीही उठून त्यांच्या कार्यक्षमतेवर बोलतो, त्यांनी काय केले पाहिजे हे सांगतो, हे चुकीचे आहे.
डॉ. दाभोलकर यांच्या हत्येचा छडा लागावा, अशी पोलिसांची इच्छा आहे. त्यासाठी ते प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. पोलिसांवर होणारे आरोप कमी करून नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे, अशी निवृत्त पोलिसांची अपेक्षा आहे.
सेवानिवृत्त पोलीस म्हणतात...
वैज्ञानिक दृष्टीने घडणाऱ्या गोष्टी सोप्या शब्दांत मांडणाऱ्या डॉ. दाभोलकरांचा खून होणं, ही बाब अजूनही पचनी पडणारी नाही. पोलिसांवर चहुबाजूने शेरेबाजी होत आहे. पोलिसांकडे कुठलाही चमत्कार नाही, प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावरच ते तपास करतात. या तपासासाठी प्रत्यक्षदर्शींनीही पुढे येणे गरजेचे आहे.
- बाजीराव कदम, उपविभागीय अधिकारी
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येने साताऱ्यासह अवघ्या महाराष्ट्राची मोठी हानी झाली आहे. त्यांच्या जाण्याचा धक्का निवृत्त पोलीस म्हणून मला आहे. पोलीस तपास करण्याची पध्दत आणि त्यांची यंत्रणा विशिष्ट पध्दतीची असते. हाती आलेल्या माहितीच्या आधारावर पोलीस यंत्रणा तपास करत आहे. पोलिसांच्या तपासाला यश नक्की मिळेल आणि खुन्यांचा तपास निश्चित लागेल.
- बाजीराव दबडे, हवालदार
‘लेट बट डेफिनेट’ या उक्तीप्रमाणे पोलीस डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुन्यांपर्यंत नक्कीच पोहोचतील. पोलिसांच्या हाती लागलेली माहिती आणि त्यांच्या तपासाची पध्दत याविषयी सामान्यांना माहिती असत नाही. त्यामुळे पोलिसांवर उशिरा तपास लागल्याचा आक्षेप घेतला जात आहे. हे प्रकरण संवेदनशील आणि हाय प्रोफाईल असल्यामुळे पोलिसांवर मानसिक ताणही मोठ्या प्रमाणावर आहे.
- रामचंद्र हाके, फौजदार
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येची घटना गंभीर होती. वर्ष सरत आले तरी त्यांचे मारेकरी न सापडणं ही बाब क्लेशदायक आहे. योग्यवेळीच गंभीर दखल घेऊन योग्य सापळा रचला असता, नाकाबंदी केली असती तर त्यांचे मारेकरी कदाचित हाती लागले असते. वर्ष उलटून गेल्यानंतरही गुन्हेगार न सापडणं ही बाब खेदजनक अशीच आहे.
- श्रीकांत माने, हवालदार