कोपर्डे हवेलीत एकहाती; तांबवेत त्रिशंकू !
By Admin | Updated: November 5, 2015 23:54 IST2015-11-05T22:44:31+5:302015-11-05T23:54:16+5:30
ग्रामपंचायत निवडणूक : तांबवेत काका, बाबा गट बांधणार सत्तेची मोट; कोपर्डे हवेलीत बारा नव्या चेहऱ्यांना संधी

कोपर्डे हवेलीत एकहाती; तांबवेत त्रिशंकू !
कोपर्डे हवेली/तांबवे : येथील ग्रामपंचायतीमध्ये मतदारांनी कोणत्याच पॅनेलला बहुमत न दिल्याने त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली आहे. काका व बाबा गट एकत्रित येऊन येथे सत्तास्थापन करणार आहेत. मात्र या युतीमुळे काका गटाच्या एकहाती असणाऱ्या वर्चस्वाला धक्का बसणार आहे. दरम्यान, कऱ्हाड उत्तरमधील राजकीय संवेदनशील गाव म्हणून ओळख असणाऱ्या कोपर्डे हवेलीत राष्ट्रवादीला एकहाती सत्ता मिळाली. निवडणुकीत पक्षीय राजकारणाबरोबर येथे भावकीचे राजकारण दिसून आले. निवडून आलेल्यांमध्ये बारा नवे चेहरे आहेत.
तांबवे ग्रामपंचायतीमध्ये पंचवार्षिक निवडणुकीत माजी जिल्हा परिषद सदस्य द. धो. पाटील, अण्णासाहेब पाटील, माजी सरपंच प्रदीप पाटील, अविनाश पाटील यांच्या सहकार पॅनेलला पाच जागा मिळाल्या. माजी उपसरपंच आनंदराव ताटे, निवासराव पाटील, एम. जे. पाटील यांच्या भैरवनाथ पॅनेलला सहा जागा मिळाल्या. तर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे नेतृत्त्व मानणाऱ्या अशोक पाटील, सतीश पाटील, सह्याद्री कारखाना संचालक पी. डी. पाटील यांच्या तांबजाई पॅनेलने दोन जागा मिळवून चंचप्रवेश केला. परिणामी, येथे त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली आहे. माजी आमदार विलासराव पाटील- उंडाळकर यांना मानणाऱ्या सहकार व भैरवनाथ पॅनेलमध्ये मुख्य चुरशीची लढत झाली. परंतु काका गटाच्या भैरवनाथ पॅनेलने माजी मुख्यमंत्री गटाच्या तांबजाई पॅनेलसोबत साटेलोटे केल्याने त्यांना वॉर्ड क्रमांक दोन मध्ये दोन जागा जिंकता आल्या. आता त्यांची साथ घेऊनच सत्ता स्थापन करण्यात येणार आहे. त्यामुळे काका गटाच्याच सहकार पॅनेलला विरोधकांची भूमिका बजवावी लागणार आहे.
भैरवनाथ व तांबजाई पॅनेलचे माजी सरपंच प्रदीप पाटील यांच्या सहकार पॅनेलला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी वॉर्ड क्रमांक २, ३ व ४ मध्ये साटेलोटे केल्याने तेथे दुरंगी लढत झालीे. तर १ व ५ मध्ये तिरंगी लढत झाली. सरपंचपद मागासवर्गीय प्रवर्गासाठी राखीव असून, निवडणुकीसाठी अनेक उमेदवारांनी लाखोंचा चुराडा केला आहे. तसेच अनेकांनी एकमेकांची उणीदुणी काढली आहेत. भावकीचे राजकारण स्थानिक पातळीवर करण्यात आले. त्यामुळे तांबवे ग्रामपंचायतीत प्रथमच पृथ्वीराज चव्हाण गटाने २ जागा जिंकून प्रवेश केला आहे. एकहाती माजी उंडाळकर यांच्याकडे असणाऱ्या सत्तेला हादरा दिला आहे. तसेच ग्रामपंचायतीत सत्ता स्थापनेतही
मुख्य भूमिका बजावणार आहे. आता हे स्थानिक पातळीवरील हेवेदावे विसरून सर्वांनी एकत्रित येऊन
गावचा विकास करावा, अशी अपेक्षा ग्रामस्थातून केली जात
आहे.
कोपर्डे हवेली ग्रामपंचायतीची निवडणूक पक्षीय राजकारणाबरोबर समविचारी लोकांनी एकत्रित येऊन लढविली. निवडणूक शांततापूर्ण आणि एकमेकांच्यावर टीका न करता लढविली गेली, हे या निवडणुकीचे वैशिष्ठ्य होते. सत्ताधारी पाच वर्षांमध्ये विकासकामे मतदारांच्यापुढे घेऊन गेली.
तर विरोधक विकास कामातील त्रुटी आणि भविष्यात काय विकास करणार, हे सांगत मतदारांच्या पुढे गेले होते. २०१० मध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये सत्ताधाऱ्यांचे ८ सदस्य निवडून आले होते तर विरोधकांचे ७ सदस्य होते. यावेळी सत्ताधाऱ्यांचे ९ सदस्य निवडून आले तर विरोधकांचे ६ सदस्य निवडून आल्याने पुन्हा सत्ताधाऱ्यांची सरशी झाली. १, ३, ५ या प्रभागामध्ये सत्ताधाऱ्यांचे उमेदवार निवडून आले आहेत. तर २, ४ हे प्रभाग विरोधकांचे निवडून आले आहेत.
सुरुवातीपासूनच प्रत्येक प्रभागाची निवणूक अटीतटीची होईल असेच चित्र होते. मतदारांचा दोन्ही गटांना अंदाज येत नव्हता. त्यामुळे निवडणूक अटीतटीची होईल असा प्रत्येकाचा अंदाज होता. निकालानंतर प्रत्येक प्रभागामध्ये उमेदवार चांगल्या मतांनी निवडून आले आहेत. सध्या १२ नवे चेहरे निवडून आले आहेत. ग्रामपंचायतीमध्ये पंधरा सदस्यसंख्या आहे. (वार्ताहर)
राजकारण घराभोवती फिरले
कोपर्डे हवेलीत प्रभाग ५ हा आरक्षित असल्याने याठिकाणी दोन्ही गटांकडून ताकद लावण्यात आली होती. निकालानंतर येथील सत्ताधारी गटाचे तिन्ही उमेदवार सुमारे ३०० मतांच्या फरकाने निवडून आले आहेत. येथील राजकारण एका घराभोवती फिरते हे सिद्ध झाले आहे. प्रभाग ४ मध्ये दोन अपक्ष उमेदवार होते. त्यातील एका अपक्षाने ७० च्या दरम्यान मते मिळविल्याने त्याचा तोटा कुणालाही झाला नाही याविषयी सध्या चर्चा सुरू आहे.
शंभूराज देसाई गटाची संधी हुकली
तांबवे गावचा पाटण मतदारसंघात समावेश असल्याने देसाई-पाटणकर यांच्यापैकी कोणाची सत्ता येणार, याकडे पाटण तालुक्याचे लक्ष होते. मात्र राजकारण स्थानिक पातळीवर केले गेले. तसेच देसाई गटाचे माजी सरपंच प्रदीप पाटील यांच्या विरोधात देसाई गटाच्या स्थानिक नेत्यांनी काम केल्याने विद्यमान आमदार शंभूराज देसाई गटाला वर्चस्व मिळविण्याची संधी हुकली आहे.