विधानसभेत सोयीचं, पालिकेत बेरजेचं !

By Admin | Updated: November 11, 2014 23:24 IST2014-11-11T21:59:26+5:302014-11-11T23:24:46+5:30

कऱ्हाडात नगरसेवकांचा आघाडी धर्म : ‘आमदारकी’ला तु तू मै मै करणाऱ्यांच सभागृहात ‘तुझ्या गळा, माझ्या गळा’

Convenient in the assembly, the municipal corporation! | विधानसभेत सोयीचं, पालिकेत बेरजेचं !

विधानसभेत सोयीचं, पालिकेत बेरजेचं !

प्रमोद सुकरे - कऱ्हाड विधानसभा निवडणुकीचा गुलाल खाली बसल्यानंतर सोमवारी प्रथमच पालिकेत सर्वसाधारण सभा झाली. निवडणुक प्रचारात काही नगरसेवकांनी एकमेकांचे हात सोडलेले तर काहींनी एकमेकांच्या हातात हात घातलेले. एकमेकांना हात दाखणिारे ‘नगर’सेवक सभागृहात एकत्र दिसले. मात्र त्यांनी आघाडी धर्म पाळला.
सोमवारी सायंकाळी घड्याळात ५ वाजले अन् राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेल्या कऱ्हाड पालिकेत सर्वसाधारण सभा सुरू झाली. विधानसभा निवडणुकीत जरी हातात हात घातला असला तरी आपल्या आघाड्यांप्रमाणे काँग्रेस राष्ट्रवादीवाले स्वतंत्रच बसले; पण बसण्याची जागा बदलल्याने दोन्ही काँग्रेस नगरसेवकांच्यातील जवळीक स्पष्ट जाणवली बरे ! पण त्यामध्येच बसलेल्या कमळाच्या पाकळ्या जरा दचकल्या ! खरी अडचण झाली ती पवारांची. ते सभागृहात एकाकी पडले. विरोधी पक्षनेते पदावरून त्यांना यापुर्वी मदत करणारेही यावेळी गप्प होते.
विधानसभा निवडणुकीत वेगवेगळ्या पक्षांचे झेंडे हातात घेतलेले, तर काहींनी एकत्र राहूनही एकमेकांना ‘टोप्या’ घातलेल्या. तर तुझ्या गळा माझ्या गळा म्हणत भलत्याच पक्षांचे मफलर गळ्यात घेतलेले. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या खऱ्या; पण राजकारणात माहिर असणाऱ्या या बहाद्दरांना त्याचे काहीच वाटत नाही, हे सभागृहात एकमेकांशी हास्यविनोद करताना आज जाणवले.
खरंतर पवारांनी ‘कृष्णा’ आघाडीच्या सर्वच नगरसेवकांना आता विधानसभा संपली वाद संपला, अशी साद घातली; पण नेहमी ‘विनयाने’ बोलणाऱ्या एका ज्येष्ठ नगरसेवकांनी या ‘महादेवाची’ चांगलीच फिरकी घेतली अन् बोलत बोलतच सभागृहात पोहोचले. तेथे पवारांना नेहमीच्या जागेवर बसू दिले अन् उरलेले सर्व नगरसेवक स्वतंत्र बसले. त्यामुळे ‘पवार’ एकाकी पडले.
कऱ्हाडच्या राजकारणात डॉ. अतुल भोसले लक्ष घालणार, हे आता स्पष्ट झाले आहे. त्यासाठी त्यांनी एका ‘दादा’ नगरसेवकाला हाताशी धरले आहे. त्याची चुणूक विधानसभा निवडणुकीत पहायलाही मिळालीय. त्यामुळे पालिकेत आत्तापासुनच काही घडामोडी पहायला मिळतील, अशी अपेक्षा होती. मात्र, सध्यातरी तशी शांतता दिसतेय.

कमळाच्या पाकळ्या विखुरलेल्या !
विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार डॉ. अतुल भोसले यांच्या प्रचारात अनेक नगरसेवक सक्रिय होते. त्यात महादेव पवार हे भोसले समर्थकच; पण याशिवाय लोकशाही आघाडीचे ज्येष्ठ नगरसेवक जयवंत पाटील, आप्पा माने यांच्यासह काही नगरसेवकही कमळाला भुलले. तर जनशक्ती आघाडीतील पावसकर पिता-पुत्रही कमळाच्या व्यासपिठावर होते. निवडणुक प्रचारात एकत्र असणारे नगरसेवक सभागृहात मात्र स्वतंत्रच बसलेले पहायला मिळाले. त्यामुळे कमळाच्या पाकळ्या विखुरल्याची चर्चा होती.

विरोधी गटनेते पदावर पडदा पडला का ?
यशवंतराव चव्हाण कृष्णा विकास आघाडीत विरोधी गट नेतेपदावरून चांगलेच बिनसले आहे. महादेव पवार आणि स्मिता हुलवान दावा सोडायला तयार नाहीत. आज मात्र सभागृहात स्मिता हुलवान व इतर विरोधी आघाडीचे नगरसेवक एकत्रित बसले तर महादेव पवार एकाकी पडले. त्यामुळे कुणाबरोबर किती नगरसेवक आहेत, हे स्पष्ट झाले आहेत. त्यामुळे गटनेतेपदावर पडदा पडायला आतातरी हरकत नाही.


ही भविष्यातील राजकिय समिकरणांची नांदी नव्हे काय ?
सभागृहात उपनगराध्यक्ष राजेंद्र यादव यांनी नवनिर्वाचित आमदार पृथ्वीराज चव्हाण व बाळासाहेब पाटील यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. त्याला स्मिता हुलवान यांनी अनुमोदन दिले. त्यामुळे ही भविष्यात हातात हात घालून राजकारण होणार याची नांदी मानायला हरकत नाही. आता काही सदस्यांना हे कितपत पटेल, हे सांगता येत नाही.

Web Title: Convenient in the assembly, the municipal corporation!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.