नितीन काळेल सातारा : जिल्ह्यात उन्हाळा असूनही पावसाळी स्थिती निर्माण झालेली आहे. कारण, मागील पाच दिवसांपासून आभाळ फाटल्यासारखा पाऊस पडत आहे. सातारा शहरात तर पावसाची संततधारच आहे. त्यामुळे नागरिकांना सूर्यदर्शनही होईना. तसेच जिल्ह्यात सर्वत्र पाऊस होत असून शुक्रवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी ४३.९ मिलिमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली आहे.जिल्ह्यात मे महिन्याच्या मध्याच्या सुमारास वातावरणात बदल झाला. त्यानंतर ढगाळ वातावरण तयार होत गेले. तर १५ मे नंतर वळीवाचा पाऊस पडण्यास सुरूवात झाली. मात्र, सोमवारपासून जिल्ह्यात धुवाधार पाऊस पडत आहे. या पावसाला उसंत नाहीच. सातारा शहरात तर दिवस-रात्र पाऊस पडू लागला आहे. मागील चार दिवसांत पावसाने दमदार हजेरी लावली. यामुळे नुकसानीच्या घटनाही घडल्या आहेत.त्यातच शुक्रवारी सकाळपासूनही शहरासह परिसरात पाऊस पडत होता. परिणामी नोकरदारांचे हाल झाले. तसेच नागरिकांनाही पावसामुळे घराबाहेर पडता आले नाही. जिल्ह्यातीलही अनेक भागात दमदार पाऊस पडला. यामुळे खरीप हंगामातील पेरणीला वेळेतच सुरुवात होणार आहे.
जावळी तालुक्यात १०७ मिलिमीटर पाऊस..सातारा जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात पावसाची नोंद झाली आहे. शुक्रवारी सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी ४३.९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर सर्वाधिक पाऊस जावळी तालुक्यात १०७.३ मिलिमीटर पडला.
महाबळेश्वर तालुक्यात १०३ मिलिमीटर तसेच वाई तालुका ७८, सातारा ६५.५, पाटण ४४.५, कोरेगाव ४३.९, खंडाळा तालुक्यात ४३.३ मिलिमीटर पाऊस झाला आहे. तर दुष्काळी माण तालुक्यात १०.२, खटावला १३.१ मिलिमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली आहे.