पेट्री : सातारा-बामणोली मार्गावर घाटाई फाट्यापासून चार किलोमीटर अंतरावर घाटवण येथील घाटाई मंदिराशेजारी असलेला गोमुख झरा अनेक शतकांपासून वाहत आहे. पांडवकालीन ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी परिसरातील निगा राखण्याची मागणी होत आहे. दरवर्षी पौष कृष्ण संकष्टी चतुर्थीला घाटवण येथील घाटाईदेवीची दोन दिवसांची यात्रा भरते. या घाटाईदेवी मंदिरानजीक गोमुख असणारा अखंड निखळ पाण्याचा झरा बारमाही वाहतो. या गोमुखी असणाऱ्या झऱ्याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे याची रचना पांडवकाळातील असल्याचे सांगितले जाते. आसपास कोठेही झरा नसून या कास पठाराच्या कुशीत घाटवण येथील घाटाई मंदिराजवळ या गोमुखी झऱ्यातून अखंड वाहणारे पाणी आत्तापर्यंत दररोज देवीच्या पूजेसाठी वापरले जाते. तसेच यात्रेदरम्यान लाखो भाविकांना याद्वारे मुबलक पाणी उपलब्ध होते. दरम्यान, यात्रेवेळी पाण्याची कसलीही कमतरता भासत नाही एवढे पाणी या झऱ्याद्वारे उपलब्ध होते. या झऱ्याचे बांधकाम पाच फूट लांब व पाच फूट रुंद असे आहे. (वार्ताहर)पांडवकालीन गोमुखी झऱ्याचे बांधकाम जांभा खडक व चुन्यामध्ये केलेले आहे. कित्येक शतकांपूर्वी असणाऱ्या या झऱ्याचे पाणी आजतागायत कमी झालेले नाही.-भगवान काळे, ग्रामस्थ घाटवणहा गोमुखी झरा किमान १८५३ पूर्वीपासून असावा, असे परिसरातील जुने जाणकर सांगत असतात. झऱ्यातील उपलब्ध पाण्याचा वापर केवळ देवीच्या पुजनासाठी केला जातो.-विठ्ठल भगत, घाटाई मंदिर -पुजारी
अखंड वाहतोय घाटवणचा गोमुख झरा!
By admin | Updated: January 4, 2016 00:34 IST