आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कर्जाची माहिती घेण्याचे काम सुरू
By Admin | Updated: March 23, 2015 00:41 IST2015-03-22T22:45:33+5:302015-03-23T00:41:17+5:30
जावळी तालुका : दु:खात बुडालेल्या कुटुंबीयाचे तहसीलदारांकडून सांत्वन

आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कर्जाची माहिती घेण्याचे काम सुरू
कुडाळ : राणगेघर, ता. जावळी येथील शेतकरी दिलीप आनंदराव करंदकर (वय ४३) या शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून शुक्रवारी सकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. घटनेची माहिती मिळाल्यानंतर तहसीलदार रणजित देसाई यांनी करंदकर यांच्या कुटुंबीयाची भेट घेऊन सांत्वन केले.याबाबत माहिती अशी की, राणगेघर येथील दिलीप करंदकर यांची स्वत:ची चार एकर शेती आहे. त्यांनी शेतीघरासाठी सोसायटीतून तीन एकर, २५ हजार कर्ज व पीककर्ज ४० हजार घेतले होते. डोक्यावर कर्जाचा बोजा झाल्यामुळे पैशांच्या विवंचनेतून त्यांना मार्चअखेरचा धसका समोर दिसत होता. या विवंचनेतून ते १६ मार्च रोजी ‘पैसे आणायला जातो,’ असे सांगून ते घरातून बाहेर गेले होते. चार दिवसांनंतरही ते घरी परतले नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी करहर पोलीस दूरक्षेत्रात फिर्याद दिली होती. दरम्यान, शुक्रवारी सकाळी साडेआठच्या सुमारास त्यांच्या कोठारे या भातशेतीच्या शिवारात ओढ्याच्या काठी असलेल्या जांभळाच्या झाडाला दोरीच्या साह्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. करहर पोलीस दूरक्षेत्रात नोंद झाली असून, सहायक फौजदार एम. आर. शेडगे तपास करत आहेत. (प्रतिनिधी)
आम आदमी योजनेचा लाभ देण्यासाठी पुढाकार
घटनेची माहिती मिळाल्यानंतर तहसीलदार रणजित देसाई यांनी कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. संजय गांधी आम आदमी योजनेचा लाभ करंदकर कुटुंबीयांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. दरम्यान, करंदकर यांच्या कर्जाची माहिती महसूल विभाग घेत आहे.