मदन भोसले कमळाच्या संपर्कात !

By Admin | Updated: August 3, 2014 22:45 IST2014-08-03T21:39:58+5:302014-08-03T22:45:15+5:30

गोविंद केंद्रे : पाच मतदारसंघ भाजपला सोडण्याची मागणी

Contact with Madan Bhosale Kamal! | मदन भोसले कमळाच्या संपर्कात !

मदन भोसले कमळाच्या संपर्कात !

सातारा : वाई विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि काँग्रेसचे नेते मदन भोसले भारतीय जनता पार्टीच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट पक्षनिरीक्षक गोविंद केंद्रे यांनी केल्यामुळे जिल्ह्याच्या राजकीय क्षेत्रात चांगलीच खळबळ उडाली आहे. दरम्यान, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देऊन बाहेर पडलेले माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर यांनीही माणमधून उमेदवारी मिळावी म्हणून वरिष्ठांशी हॉटलाइनवर संपर्कात असल्याचा दावा केंद्रे यांनी केला आहे.
भाजपच्या शहर कार्यालयात पक्षनिरीक्षक तथा माजी आमदार गोविंद केंद्रे आणि सुनील बडे यांनी विधानसभेसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. यानंतर त्यांनी पत्रकारांशी बातचित केली. यावेळी जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. भरत पाटील, शहराध्यक्षा सुवर्णा पाटील, जिल्हा सरचिटणीस दत्ताजी थोरात, विष्णू पाटस्कर त्याचबरोबर अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, भाजपच्या शहर कार्यालयात झालेल्या चर्चेदरम्यान, जिल्ह्यातून आलेल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आपली भूमिका मांडली. ग्रामीण भागात काम करत असताना येणाऱ्या अडचणी, समस्या यावरही अनेकांनी भाष्य केले.
माजी आमदार केंद्रे म्हणाले, ‘जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघांचा आढावा आम्ही घेतला असून, इच्छुकांच्या मुलाखतीही घेतल्या. त्यामुळे सातारा, कऱ्हाड दक्षिण, माण, कोरेगाव आणि वाई हे मतदारसंघ भाजपला सोडण्याची मागणी कोअर कमिटीकडे करणार आहे. माजी आमदार मदन भोसले भाजपच्या संपर्कात आहेत. त्यांच्याबाबतही आमची चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष डॉ. दिलीप येळगावकर वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात आहेत. त्यांच्या प्रवेशाचा निर्णय वरिष्ठ पातळीवरच होणार आहे.’ (प्रतिनिधी)
भाजपकडे इच्छुकांची मांदियाळी
जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघांतून भाजपकडे अनेकांनी उमेदवारीची मागणी केली आहे. कोरेगावातून माजी आमदार कांताताई नलावडे, सोपानराव गवळी तर कऱ्हाड उत्तरमधून उद्योजक अ‍ॅड. धैर्यशील पाटील-शिरगावकर आणि फलटणमधून डॉ. नंदकुमार तासगावकर, दीपक गायकवाड यांनी मागणी केली आहे. सातारामधून सुवर्णा पाटील, दत्ताजी थोरात, शिवाजी जाधव यांनी मागणी केली आहे. कऱ्हाड दक्षिणमधून जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. भारत पाटील, विष्णू पाटस्कर, नितीश देशपांडे, पाटणमधून दीपक महाडिक, नानासाहेब सावंत, कविता सत्रे यांनी मागणी केली आहे. माणमधून धनंजय आेंबासे, महादेव कापसे, बाळासाहेब खाडे, उज्ज्वल काळे, बाळासाहेब मासाळ, जालिंदर माळी, सतीश शेटे यांनी उमेदवारी मागितली आहे.

Web Title: Contact with Madan Bhosale Kamal!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.