कास-बामणोलीत भलरी दादा भलरीच्या संगतीत भात लागवण
By Admin | Updated: July 10, 2017 14:27 IST2017-07-10T14:27:05+5:302017-07-10T14:27:05+5:30
शेतकऱ्याची लगबग : डोक्यावर इरले, पोती अन कागदाची टापूस बांधून लावणीला वेग

कास-बामणोलीत भलरी दादा भलरीच्या संगतीत भात लागवण
आॅनलाईन लोकमत
पेट्री (जि. सातारा), दि. १0 : पश्चिम घाटात गेल्या आठवड्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे कास, बामणोली परिसरातील शेतकरी भात लावणीत मग्न आहेत. डोक्यावर इरले, पोती व कागदाची टापूस बांधून मुसळधार पावसात भाताची लावणी करण्यात मग्न झाले आहेत. तसेच भात लावणीसाठी बैलांच्या सहाय्याने चिखलणी करण्याचे कामही सुरू असल्याचे दिसून येत आहे.
कास-बामणोली परिसर हा घाटमाथा म्हणून ओळखला जातो. हा भाग सह्याद्रीच्या पर्वतरांगांनी वेढलेला आहे. या भागात पावसाचे प्रमाण अधिक असते. येथील डोंगर उतारामुळे पावसाचे पाणी पूर्णपणे वाहून जाते. यामुळे जमिनीत कमी प्रमाणात पाणी मुरते. लाल माती, मुरबाड जमीन असल्याने येथील शेतकरी भात, नाचणी, वरी ही पिके मोठ्या प्रमाणावर घेतात.
या भागातील जमिनी निकृष्ट, तीव्र डोंगर उतार व लाल मातीच्या असल्यामुळे चांगली पिके येण्यासाठी खूप मशागत करावी लागते. येथील शेतकरी डिसेंबर, जानेवारी महिन्यात ऐन, उंबर, जांभुळ अशा झाडांच्या फाद्यांची कवळे बांधली होती.
होळीनंतर तयार केलेल्या तरव्यांची भाजणी केली गेली. मान्सूनपूर्व पावसाळ्याला सुरूवात होताच जून महिन्यात या तरव्यांमध्ये भातांच्या बियाण्यांची रोपे तयार करण्यासाठीची पेरणी करण्यात आली होती.
भात लावणीसाठी तयार केलेली रोपे साधारणत: २१ ते ३० दिवसांपर्यंत योग्य वाढ झाल्यानंतर पारंपरिक पद्धतीने औताच्या साह्याने चिखलणी तयार करून या चिखलणीत तरव्यातील भाताच्या रोपांची लावणी करण्यात येत आहे.
गाण्यांची साथ...
डोक्यावर इरलीचा आधार घेऊन, पोती व कागदाची टापूस बांधून मुसळधार पावसात शेतकरी भाताची लावणी करत आहेत. भात लावणी करत असताना करमणुकीसाठी तसेच कामात कंटाळा येऊ नये म्हणून शेतकरी गिते म्हणताना दिसत आहेत.
भाताची लावणी करण्यासाठी अनेकांची आवश्यकता लागत असते. लावणी करताना एकमेकांना मदत करण्यात येते. यालाच या परिसरात पैरा असे म्हटले जाते.
- ज्ञानेश्वर आखाडे,
शेतकरी, कुसुंबीमुरा