बांधकामात काँक्रिट पक्केच हवे
By Admin | Updated: February 8, 2015 00:53 IST2015-02-08T00:50:13+5:302015-02-08T00:53:14+5:30
ए. डी. बालाजी : वास्तुविश्व प्रदर्शनाचा दुसरा दिवस; चर्चासत्राला प्रतिसाद

बांधकामात काँक्रिट पक्केच हवे
कऱ्हाड : ‘इमारतींचे बांधकाम करत असताना काँक्रिटीकरण महत्त्वाचा घटक असतो, त्यामुळे इमारतीची मजबुती व दीर्घकाळ टिकण्याची क्षमता लक्षात येते. आजच्या काळात बांधकाम क्षेत्रात काँक्रिटीकरण इंजिनिअर व आर्किटेक्चर यांच्या दृष्टीने वापरणे गरजेचे आहे,’ असे मत इलेक्ट्रॉनिक इंडियाचे मॅनेजिंग डायरेक्टर ए. डी. बालाजी यांनी व्यक्त केले.
दि कऱ्हाड आर्किटेक्ट आणि इंजिनिअर्स असोसिएशनच्या वतीने आयोजित ‘वास्तूविश्व २०१५’ प्रदर्शनाच्या काँक्रिट या विषयावरील आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते. यावेळी कऱ्हाड आर्किटेक्ट व इंजिनिअर्स असोसिएशनचे अध्यक्ष अरविंद खबाले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपस्थित होते.
मॅनेजिंग डायरेक्टर बालाजी म्हणाले, ‘बांधकाम क्षेत्रात काँक्रिटीकरणाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. इमारतीच्या पायाभरणीपासून ते प्रत्येक गोष्टीत काँक्रीटचा वापर होतो. आर्किटेक्चर व इंजिनिअरकडून महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे. त्यासाठी बांधकामात वापरला जाणारा सिमेंटचा दर्जा, पाणी वापराची क्षमता अशा गोष्टी विचारात घ्याव्या लागतात. इमारत बांधकामासाठी शक्यतो काँक्रिट हे मशीननेच मिक्स करून वापरावे, जेणेकरून ते जास्त एकजीव होऊन इमारत बांधकाम वापरास सोयीस्कर ठरेल.’
बांधकामात प्लास्टिक व लोखंडी या दोन्ही गोष्टींना महत्त्व दिले जाते. इमारत बांधताना इंजिनिअर व आर्किटेक्चर्सनी चांगल्या व उत्तम दर्जाचे मटेरिअल वापराबरोबर उत्तम व कुशल असा कामगारवर्गाचा वापर करावा, असा सल्ला इलेक्ट्रॉनिक इंडियाचे मॅनेजिंग डायरेक्टर ए. डी. बालाजी यांनी चर्चासत्रावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना दिला.
अरविंद खबाले म्हणाले, ‘इंजिनिअर व आर्किटेक्चर क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी अशा प्रकारच्या प्रदर्शनाचा जास्तीत जास्त लाभ घेतला पाहिजे. पुस्तकी ज्ञानाला महत्त्व देण्याबरोबर प्रत्यक्ष कामाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी जास्त ज्ञान मिळविणे गरजेचे आहे. कऱ्हाड इंजिनिअर व आर्किटेक्चर असोसिएशनच्या माध्यमातून इंजिनिअर क्षेत्रातील विविध चर्चासत्रातून माहिती देण्याचे काम केले जाते. त्यांचा लाभ विद्यार्थ्यांना भविष्यकाळात होतो.’
यावेळी इलेक्ट्रॉनिक इंडियाचे मॅनेजिंग डायरेक्टर बालाजी यांनी अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना माहिती दिली.
भविष्यातील इंजिनिअर्सची प्रदर्शनाला भेट
‘वास्तुविश्व २०१५’ या इंजिनिअर व आर्किटेक्चर क्षेत्रातील प्रदर्शनास येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी भेट दिली व चर्चासत्रास उपस्थिती लावली. या प्रदर्शनानिमित्त खऱ्या खुऱ्या इंजिनिअर्स व आर्किटेक्चरचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना यावेळी लाभले.