बांधकाम साहित्य वीस टक्के महाग
By Admin | Updated: June 30, 2014 00:40 IST2014-06-30T00:37:50+5:302014-06-30T00:40:10+5:30
व्यावसायिक हवालदिल : वाळू, सिमेंट, खडीचा समावेश

बांधकाम साहित्य वीस टक्के महाग
अंजर अथणीकर ल्ल सांगली
वाळू, खडी, वीट व सिमेंट दरात अचानकपणे वीस टक्के वाढ झाल्याने बांधकाम व्यावसायिक हवालदिल झाले आहेत. मे महिन्यानंतर बांधकाम हंगाम संपत असल्यामुळे दरवर्षी या कालावधित बांधकाम साहित्याचे दर उतरत असताना, यावर्षी मात्र पावसाळ्याच्या तोंडावरच बांधकाम साहित्य महागल्याने बांधकाम व्यावसायिकांबरोबर घराचे स्वप्न सत्यात उतरवू पाहणाऱ्या नागरिकांना धक्का बसला आहे.
जिल्हा प्रशासनाने ओव्हरलोड वाहतूक करणाऱ्या वाळू ट्रकवर जोरदार कारवाई सुरु केल्याने बेगमपूर येथून मोठ्याप्रमाणात येणारी वाळू आता बंद झाली आहे. त्याचबरोबर वाळू वाहतूक व उपसा यासंदर्भात नियमांची कडक अंमलबजावणी सुरु केल्याने बाजारातील वाळूची आवक आता निम्म्यावर आली आहे. यामुळे वाळूचे दर ब्रासला तब्बल दोन हजारांनी वाढले आहेत. आता वाळूचा दर साडेपाच हजार ते सहा हजारच्या घरात गेला आहे. खडीचाही दर तीनशे रुपयांनी वाढला आहे. विटांचा दर (हजारी) १ हजार रुपयांनी वाढला आहे. तीन हजार दोनशे रुपयांचा दर आता ४ हजार शंभर रुपये (चार इंची) व चार हजार चारशे रुपये (सहा इंची) विटांचा दर झाला आहे. त्यामुळे घर बांधण्याच्या तयारीत असलेल्या लोकांना फटका बसला आहे.