कालव्यांची निर्मिती.. .. ओढ्यांना काळ !
By Admin | Updated: April 8, 2016 23:55 IST2016-04-08T20:53:37+5:302016-04-08T23:55:28+5:30
फलटण पश्चिम तालुका : जलस्त्रोत आटल्याने पाण्यासाठी वणवण--पाणी अखेर पळविले कुठे?

कालव्यांची निर्मिती.. .. ओढ्यांना काळ !
सूर्यकांत निंबाळकर-- आदर्की --तालुक्याच्या पश्चिम भागातील सालपे ते बीबी गावापर्यंत धोम-बलकवडीचा उजवा कालवा डोंगर पायथा भागातून गेला आहे. हा कालवा दुष्काळी भागाला जरी वरदान ठरला असला तरी कालव्याच्या वरून वाहणारे ओढे कोरडे पडले आहेत. पावसात वाहत जाणारे पाणी ओढ्यांऐवजी कालव्यात जात आहे. परिणामी पश्चिमेकडील हिंगणगावसह अनेक गावांना पाणीटंचाईची झळ बसत असून, ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे.हिंगणगाव महसुली विभागातील आदर्की रेल्वेस्टेशन परिसरात ब्रिटिशकाळात रेल्वेलाईन तयार करण्यासाठी बोगद्याचे काम सुरूअसताना पाणीसाठा सापडला. रेल्वे प्रशासन व ठेकेदार यांनी डिझेल इंजिनद्वारे जलस्त्रोत बंद करण्याचा प्रयत्न केला. यात अपयश आल्याने अखेर लोखंड व सिमेंट टाकून जलस्त्रोत मुजविण्यात आला. यानंतर त्याठिकाणी रेल्वेलाईनचे काम करण्यात आले. रेल्वेलाईन खालून तीस मीटर खोल खोदकाम करून १२०० मीटरचा बोगदा तयार करण्यात आला. त्यावेळी २० अश्वशक्ती विद्युत मोटाराएवढे पाणी बोगद्यात पडत होते. नैसर्गिक पाण्यामुळे बोगद्याच्या काँक्रिटीकरणाचे कामही अद्याप अपूर्ण आहे.
हिंगणगावजवळील धनगरवाडा ओढ्यावर तीन पाझर तलाव असून, हे तिन्ही तलाव कोरडे पडत नाहीत. यावर्षी हे ओढे कोरडे पडले पाझर तलावांसह हिंगणगाव परिसरातील विहिरीही आटल्या आहेत. धनगरवाडा येथील पाणीपुरवठा करणारी विहीरही कोरडी पडल्यामुळे हिंगणगाव ग्रामपंचायतीमार्फत विहिरीत टँकरद्वारे पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे ग्रामस्थांना आठवड्यातून दोनदाच पाणी मिळत आहे.
नवीन विहिरीचे खोदकाम
ग्रामपंचायतीने बुरखुंडी धरणाजवळ दुसरी विहीर खोदून पाच हजार फूट पाईपलाईन टाकून ग्रामस्थांना पिण्याचे पाणी उपलब्ध करण्याचे काम सुरू केले आहे. हिंगणगावच्या ओढ्याचे पाणी कालव्यात गेल्याने ओढा कोरडा पडला असून, त्यामुळे या भागात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली.