सातारा : ‘काँग्रेस पक्ष आगामी काळातील निवडणुका स्वबळावर लढवणार आहे. त्यामुळे काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी आतापासून कामाला लागून बुथ कमिटी सक्षम कराव्यात व तालुकानिहाय दौरे सुरु करावेत. जिल्ह्यात काँग्रेसच्या ओबीसी चळवळीचे काम सक्रिय करण्यावर भर दिला जाणार आहे’, अशी माहिती काँग्रेस ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
जिल्हा काँग्रेस कमिटीत माळी यांच्या उपस्थितीत सोमवारी बैठक आयोजित केली होती, या बैठकीनंतर ते बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, महिला जिल्हाध्यक्ष धनश्री महाडिक व युवकचे जिल्हाध्यक्ष विराज शिंदे उपस्थित होते. माळी म्हणाले, ‘काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आगामी निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचे जाहीर केले आहे. यासाठी प्रत्येक जिल्ह्याचा आढावा ते घेत असून, त्याबाबत रणनीती आखली जात आहे. जिल्ह्यासह अन्य ठिकाणी ओबीसी, भटके-विमुक्त जातीचे लोक हे काँग्रेसपासून दूर गेले आहेत. काँग्रेसने या समाजांसाठी महाज्योतीसारख्या अनेक योजना आणल्या आहेत. जिल्ह्यात काँग्रेसचे ओबीसी चळवळीचे काम कमी असून, ते सक्रिय करण्यावर भर दिला जाणार आहे. ओबीसींच्या प्रदेश कार्यकारिणीवर जिल्ह्यातील ३ व जिल्हाध्यक्ष १ अशी चार पदे भरण्यात येणार आहेत. काँग्रेसचे विचार तळागाळात पोहोचणे गरजेचे असून, त्यासाठी पदाधिकाऱ्यांनी आताच कामाला लागून बुथ कमिटी बळकट करावी. त्यासाठी तालुका दौरे जास्तीत जास्त होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.