सातारा : मोठ्या राजकीय पक्षाचा प्रदेशाध्यक्ष म्हटले की, कार्यकर्त्यांची गर्दी, गाड्यांचा ताफा असे चित्र डोळ्यासमोर उभे राहते. पण, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी वाईतील प्रज्ञा पाठशाळेत मुक्काम केला. रात्री ते जमीनवर झोपले. कोठेही बडेजावपणा दिसून आला नाही. या साधेपणाबद्दल आघाडीतील पदाधिकाऱ्यांनी त्यांचे कौतुक केले. पण, विरोधकांनी पक्ष वाढीसाठी राजकारण सुरू असल्याचा आरोप केला.काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ कऱ्हाडला आले. प्रीतिसंगमावर महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी त्यांनी अभिवादन केले. त्यानंतर ते वाईला गेले. वाईतील प्रज्ञा पाठशाळेत त्यांनी शनिवारी रात्रीचा मुक्काम केला. सकाळ होताच ते निघून गेले. या मुक्कामादरम्यान त्यांनी कोठेही राजकीय भाष्य केले नाही.
विशेष म्हणजे ते प्रज्ञा पाठशाळेत रात्री मुक्कामी आहेत, हे अनेकांना माहीतही नव्हते. वाईत प्रदेशाध्यक्ष सपकाळ हे साधेपणात राहिले. याबद्दल काँग्रेस तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून काैतुक झाले. पण, राजकीय विरोधक याला राजकारण आहे. पक्षवाढ आणि लोकांत सहानुभूती मिळविण्याचा हा प्रयत्न असल्याचे म्हणतात.
देशाला अहिंसावादी विचारसरणीची गरज आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे महात्मा गांधी यांच्या विचाराने प्रेरित होऊन काम करत आहेत. काँग्रेस पक्षाला पुढे नेण्यासाठी चांगले वातावरण तयार होत आहे. त्यांच्यातील साधेपणा पक्षासाठी चांगला ठरणारा आहे. - नरेश देसाई, जिल्हा सरचिटणीस, काँग्रेस
काँग्रेस सत्तेत असताना मगरुरी केली. आता लोकांना काम करणारी माणसे हवी आहेत. काम करणाऱ्यांना जनताही विसरत नाही. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष वाईत साधेपणाने राहिले. पण हे सर्व राजकारण आहे. यामुळे मतदार काँग्रेस पक्षाला थारा देतील, त्यांना सहानभूती मिळेल, असे वाटत नाही. - चंद्रकांत जाधव, जिल्हाप्रमुख, शिंदेसेना