आबांच्या गाडीभोवती काँग्रेसचा ग‘राडा’

By Admin | Updated: April 12, 2016 00:42 IST2016-04-11T22:29:28+5:302016-04-12T00:42:09+5:30

विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली...

Congress 'raid' | आबांच्या गाडीभोवती काँग्रेसचा ग‘राडा’

आबांच्या गाडीभोवती काँग्रेसचा ग‘राडा’

लोणंद : आमदार मकरंद पाटील हे रविवारी रात्री त्यांच्या वाहनामध्ये बसल्यानंतर त्यांच्या गाडीभोवती जमलेल्या काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. आमदार पाटील यांच्या वाहनावर चढून त्यांनी अक्षरश: ग‘राडा’ घातला.
यावेळी आमदार मकरंद पाटील हे नगरपंचायतीच्या निवडणुकीत पैसे वाटप करत असल्याचा आरोप केला गेला. तसेच त्यांच्या वाहनांची तपासणी करण्याची जोरदार मागणीही काँग्रेस कार्यकर्त्यांनी केली. काँग्रेस-राष्ट्रवादीचे कार्यकर्ते समोरासमोर आल्याने घटनास्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.  दरम्यान, सहायक पोलिस निरीक्षक संदीप भोसले हे कर्मचाऱ्यांसमवेत घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर आमदार पाटील वाहनातून लोणंद पोलिस ठाण्यात आले. यावेळी सातारा, फलटण, शिरवळ, खंडाळा आदी ठिकाणांहून पोलिसांची जादा कुमक मागविण्यात आली. निवडणूक आयोगाचे भरारी पथकही लोणंद पोलिस ठाण्यात दाखल झाले. काँग्रेस कार्यकर्त्यांच्या तक्रारीनुसार आमदार मकरंद पाटील यांच्या वाहनांची संपूर्ण तपासणी व्हिडिओ शूटिंगच्या सहाय्याने केली. यावेळी वाहनामध्ये आक्षेपार्ह कोणतीही गोष्ट आढळून आली नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. काँग्रेसचे सरफराज बागवान यांनी लोणंद पोलिस ठाण्यात आमदार मकरंद पाटील यांनी ‘वाहन बाजूला घ्या, म्हणाल्याच्या कारणावरून शिवीगाळ व दमदाटी केली.’ अशी तक्रार दाखल केली.या तक्रारीनुसार लोणंद पोलिस ठाण्यात आमदार मकरंद पाटील यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, यासाठी आमदार मकरंद पाटील
यांना पोलिस ठाण्यात मध्यरात्री पाच तास ताटकळत बसावे लागले. (वार्ताहर)


विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली...
‘लोणंद नगरपंचायत निवडणुकीत विरोधकांना पराभव दिसू लागला आहे. त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. माझ्यावर बिनबुडाचे आरोप करणारे माझी गाडी तपासल्यानंतर सत्य बाहेर येताच मूग गिळून गप्प बसले. त्यांनी केलेला प्रकार हा निंदनीय आहे,’
मकरंद पाटील, आमदार


पोलिस ठाण्यात राष्ट्रवादी नेत्यांची फौज
काँग्रेस-राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये धुमश्चक्री उडाल्यानंतर व आमदार मकरंद पाटील यांना घेराव घालत पोलिस ठाण्यात आणले. त्यानंतर त्यांच्याबरोबर जिल्हा परिषद सदस्य आनंदराव शेळके-पाटील, खंडाळा पंचायत समितीचे सभापती नितीन भरगुडे-पाटील, माजी सभापती रमेश धायगुडे, बाळासाहेब शेळके, अ‍ॅड. शामराव गाढवे, मनोज पवार आदी नेत्यांची फौजही लोणंद पोलिस ठाण्यात ठाण मांडून बसली होती.

Web Title: Congress 'raid'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.