काँग्रेस-राष्ट्रवादी म्हणजे मोगल : शिवतारे
By Admin | Updated: March 9, 2016 01:06 IST2016-03-09T01:06:49+5:302016-03-09T01:06:49+5:30
विरोधकांवर कडाडून टीका : पुसेगाव येथे व्यायामशाळेचे उद्घाटन; जिहे-कठापूर योजना दोन वर्षांत मार्गी लावणार

काँग्रेस-राष्ट्रवादी म्हणजे मोगल : शिवतारे
पुसेगाव : ‘सध्याच्या विरोधकांकडे जलसंधारण व जलसंपदा खात्याचा कारभार होता तर मग का त्या योजना पूर्णत्वाला गेल्या नाहीत. येरळा नदी पुनरुज्जीवन ही योजना युती शासनाची असून, याचे श्रेय काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस सारखे आधुनिक मुगल जाणीवपूर्वक घेत असतील तर कदापीही सहन करणार नाही,’ असा इशारा पालकमंत्री विजय शिवतारे यांनी युती शासनाने सप्टेंबर १९९७ रोजी सुरू केलेली जिहे-कटापूर योजना आपल्याच सरकारच्या काळात येत्या दोन वर्षांत पूर्ण करणार असल्याची ग्वाही दिली.
पुसेगाव, ता. खटाव येथील ग्रामपंचायतीच्या मागणीनुसार राज्य शासनाच्या क्रीडा विभागाच्या वतीने मंजूर केलेल्या व्यायामशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी शिवसेनेचे उपनेते प्रा. नितीन बानगुडे पाटील, हरणाई सुतगिरणीचे संस्थापक रणजितसिंह देशमुख, शिवसेना पुरंदर तालुकाप्रमुख दिलीप यादव, पुसेगावच्या सरपंच दीपाली मुळे, उपसरपंच रणधिर जाधव, जलसंपदाचे कार्यकारी अभियंता कदम, प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख शिवाजीराव जाधव आदींची प्रमुख उपस्थित होती.
शिवतारे म्हणाले, ‘दुष्काळी भागातील नद्या, ओढे पुन्हा प्रवाही व्हावेत यासाठी सुरू केलेल्या जलयुक्त शिवार तसेच नद्या पुनरुज्जीवन प्रकल्पासाठी सुमारे ४३ कोटींचा निधी जिल्ह्यासाठी आणला आहे. पाण्याचे नैसर्गिकरीत्या विकेंद्रीकरण करून मोठे साठे तयार करण्यावर शासनाचा भर आहे. आमचे सरकार जनतेचे आहे. त्यांच्यासाठी सुरू केलेल्या विविध योजनांची माहिती त्यांच्या पर्यंत जाणीवपूर्वक जात नाही. विरोधात आवाज उठवणारा शिवसेना पक्ष कधीही सत्तेत येऊ नये यासाठी पक्षाची व कार्यकर्त्यांची गणना जातियवादी करून पक्षाला बदनाम करण्याचा प्रयत्न या मंडळी कडून जाणीवपूर्वक केला जात असल्याचा आरोप पालकमंत्री शिवतारे यांनी केला.
पुसेगाव हे जिल्ह्यात प्रख्यात गाव असून, तरुणांच्या संघटनेने यश मिळेलआणि विकास कामांना प्रारंभ केला जाईल. येणाऱ्या काळात अधिकाधिक निधी पुसेगावसाठी दिला जाईल. शासनाच्या माध्यमातून चाललेल्या प्रत्येक कामाचे श्रेय युती शासनाचे असून, ग्रामपंचायतीने वारंवार पाठपुरावा केल्यानेच हे प्रश्न मार्गी लागले आहेत. स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दक्ष राहून अभ्यासपूर्वक सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत राहावे. शासनाच्या विविध योजनांचा अधिकाधिक लोकांना लाभ मिळवून द्यावा, असे आवाहन शिवतारे यांनी केले.
उपसरपंच रणधिर जाधव म्हणाले, ‘या भागासाठी वरदान असणारी जिहे-कटापूर योजना तत्काळ मार्गी लावण्यासाठी पालकमंत्र्यांनी विशेष प्रयत्न करावेत. यावर्षी दुष्काळसदृश परिस्थिती असल्याने नेर तलावातील गाळ शेतकऱ्यांना शासनाच्या वतीने मोफत उचलून मिळावा. योगायोगाने पालकमंत्रीही याच गावचे सुपुत्र असल्याने पालकमंत्र्यांनी पुसेगावचे पालकत्व करून लोकांना न्याय द्यावा.’
या कार्यक्रमाचे संदीप
जाधव यांनी सूत्रसंचालन केले. मुख्याध्यापक चंद्रकांत जाधव यांनी आभार मानले. (वार्ताहर)