वाईत काँग्रेस-राष्ट्रवादीचा राडा महाबळेश्वर शांततेत
By Admin | Updated: October 16, 2014 00:09 IST2014-10-15T23:07:29+5:302014-10-16T00:09:32+5:30
उंब्रजमधून मतदारांची पळवापळवी यंत्रात बिघाड, अधिकाऱ्यांची तारांबळ..ग्रामस्थांचा बहिष्कार

वाईत काँग्रेस-राष्ट्रवादीचा राडा महाबळेश्वर शांततेत
वाई : वाई विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असणाऱ्या जांभळी मतदान केंद्रापासून काही अंतरावर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते तसेच कार्यकर्त्यांच्यात बाचाबाची झाली. या घटनेची माहिती परिसरात तत्काळ समजली. यानंतर काँग्रेसचे काही कार्यकर्ते कोंढवली येथे आले. येथेही राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये जोरदार बाचाबाची तसेच मारामारी झाली. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या गाड्या फोडल्या. दरम्यान, ही माहिती पोलीस दलाला समजताच पोलीस उपअधीक्षक दीपक हुंबरे, पोलीस निरीक्षक रमेश गलांडे यांनी कर्मचाऱ्यांसह कोंढवली गावी धाव घेतली. पोलीस येथे येईपर्यंत दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते तेथून गायब झाले होते. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता.
विधानसभा निवडणुकीच्या मतदानादिवशी वाई तालुका व वाई शहरातून मतदान झाले. यात ग्रामीण भागात सकाळपासून मतदारांच्या मतदानासाठी रांगा लागल्या होत्या, तर शहरी भागात दुपारनंतर मतदार मतदानासाठी घराबाहेर पडले. मतदारसंघात एकूण मतदान ६७.२० टक्के झाले. सर्वच मतदान केंद्रांवर सुरक्षा कडक ठेवण्यात आली होती. एकूण
३ लाख १२ हजार ४५६ मतदारांपैकी २ लाख १० हजार मतदारांनी मतदानाचा हक्क
बसविला. मागील पंधरा दिवसांपासून वेगवेगळ्या पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारसभा पदयात्रा, कोपरा सभा यांनी वाई शहर व तालुका पूर्णपणे ढवळून निघाला होता. प्रत्येक पक्षाच्या उमेदवाराने आपापल्या परीने आपली भूमिका जनतेसमोर मांडली होती. ग्रामीण भागात शेतातील कामांची सुगी असल्याने शेतकरी, महिला यांनी सकाळीच आपली मते देणे पसंत केले.
काही गावांत सकाळपासूनच मतदानासाठी रांगा लागल्या होत्या, तर शहरी भागातील अधिक मतदारांनी दुपारनंतर मतदानासाठी बाहेर पडणे पसंत केले. सायंकाळी अधिक मतदान झाले. अनेक ठिकाणी वृद्ध नागरिकांना मतदानासाठी ने-आण करण्यासाठी वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी कार्यकर्ते वृद्धांना सहकार्य करत होते. वाई तालुक्यात १८४ मतदान केंद्रांवर निवडणूक प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी तसेच
चोख सुरक्षा व्यवस्था राखण्यात आली होती. निवडणुकीसाठी तालुक्यात ठिकठिकाणी पोलीस दलाच्या तुकड्या मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आल्या होत्या. (प्रतिनिधी)
1 ग्रामीण भागात शेतातील कामे सुगीचे दिवस असल्यामुळे मतदारांनी सकाळीच मतदान केंद्रांवर रांगा लावण्या होत्या, तर कडक उन्हामुळे शहरातील अधिक मतदारांनी दुपारनंतर मतदानासाठी बाहेर पडणे पसंत केले.
2 अनेक ठिकाणी वृद्ध मतदारांना आणण्यासाठी खासगी गाड्यांची सोय केली होती. त्यांना धरून, उचलून मतदान केंद्रांपर्यंत नेले जात होते, निवडणूक कोणतीही असो. पण वृद्धांची त्या दिवशी मतदानासाठी आठवण व काळजी कार्यकर्ते घेत असतात.
महाबळेश्वर तालुक्यात शांततेत मतदान
महाबळेश्वर : महाबळेश्वर तालुक्यात गुरुवारी वाई-खंडाळा-महाबळेश्वर मतदारसंघासाठी शांततेत मतदान प्रक्रिया पूर्ण झाली. सुरुवातीलाच मतदारवंघाचे शिवसेनेचे उमेदवार डी. एम. बावळेकर यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. सकाळी दहा वाजेपर्यंत धिम्या गतीने मतदान सुरू होते.सर्वच मतदान केंद्रावर पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता. पुरुष-महिलांसह ज्येष्ठांनी देखील मतदानाचा हक्क बजावला. यात तरुण युवक-युवतींचा सहभाग व उत्साह दिसून येत होता. दुपारनंतर मतदान केंद्रांवर गर्दी दिसून येत होती. अशा रितीने महाबळेश्वर व परिसरात मतदान शांततेत व सुरळीत पार पडले.
महाबळेश्वरमध्ये लांबून येणाऱ्या वयोवृद्ध नागरिकांसाठी मतदान केंद्रांपर्यंत वाहनांची सोय करण्यात आली होती. यामुळे वयोवृद्ध मतदारांना मतदानाचा हक्क बजावता आला.शहरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्यामुळे दिवसभरात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. (प्रतिनिधी)
तीन ठिकाणी यंत्रात अडचण: पोलीस बंदोबस्तात मतदान यंत्रांच्या बिघाडामुळे खोळंबा
कऱ्हाड : कऱ्हाड उत्तर विधानसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली. मात्र, काही मतदान केंद्रांवर बॅलेट मशीनमध्ये बिघाड झाल्याने खोळंबा झाला. कोणेगाव, रहिमतपूर व इंदोली येथे मशीनमध्ये बिघाड झाला, तर कोपर्डे हवेलीमध्ये बॅलेट मशीनचे बटण अडकून राहिल्याने बराचवेळ ‘बीप’ वाजत राहिली. संबंधित ठिकाणी अधिकाऱ्यांनी भेटी देऊन तातडीने मशीन दुरुस्त करण्याबरोबरच आवश्यक त्या ठिकाणी दुसऱ्या मशीन पुरविण्यात आल्या. भगतवाडी येथील मतदारांनी प्रलंबित प्रश्नांमुळे मतदानावर बहिष्कार घातला. मात्र, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी भ्रमणध्वनीवरून तेथील स्थानिक लोकप्रतिनिधींशी चर्चा करून प्रलंबित प्रश्नांबाबत काही दिवसांतच सकारात्मक निर्णय होईल, असे आश्वासन दिल्यानंतर दुपारनंतर भगतवाडीतील ग्रामस्थांनी मतदानाचा हक्क बजावला. गत विधानसभा निवडणुकीपासून उत्तरेत सातारा व खटाव तालुक्यांतील काही जिल्हा परिषद गट नव्याने समाविष्ट झाले आहेत. त्यामुळे या मतदार संघातील लढत चुरशीची बनली होती. सात उमेदवारांनी सात पक्षांचे झेंडे खांद्यावर घेत येथे विजयाची पताका फडकावण्याचे प्रयत्न केले आहे. मतदारसंघात नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमधूनही मतदानाला चांगला प्रतिसाद मिळाला. उत्तरेतील काही गावे संवेदनशील असल्याने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मात्र, कोठेही अनुचित प्रकार घडला नाही.
कोणेगावात यंत्रात बिघाड, अधिकाऱ्यांची तारांबळ
कोणेगाव येथे सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास मतदानाला सुरुवात झाली. सुरुवातीला सुरळीत मतदान झाले. मात्र, काही वेळातच मतदान यंत्रामधील बटण दबत नसल्याच्या मतदारांच्या निदर्शनास आले. त्यांनी ही बाब अधिकाऱ्यांना सांगितली. अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता बटणात बिघाड असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर काहीवेळ मतदान मशीन बंद होते़ अर्ध्या तासानंतर मशीनची दुरूस्ती झाल्यानंतर पुन्हा एकदा मतदानप्रक्रिया सुरू झाली.
शेतीकामामुळे दुपारी मतदान केंद्रे ओसअंतवडी, रिसवड, शामगाव, वडोली निळेश्वर, शाहपूर येथील मतदारांनी सकाळी ११ वाजेपर्यंत रांगा लावून मतदान केले़ मात्र, दुपारी मतदानाचा वेग मंदावला. सध्या शिवारात सोयाबीन काढणे, शाळवाची पेरणी आदी कामांची धांदल सुरू आहे. त्यामुळे दुपारी १२ ते ४ पर्यंत मतदान केंद्रे ओस पडली. भागात सकाळी ११ वाजेपर्यंत सुमारे ४० टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
उंब्रजमधून मतदारांची पळवापळवी यंत्रात बिघाड, अधिकाऱ्यांची तारांबळ
उंब्रज येथील नवीन वसाहतीमध्ये प्रामुख्याने वॉर्ड २ व ३ मध्ये तारळे भागातील ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहेत़ या ग्रामस्थांचे आपल्या मूळगावी मतदान आहे़ तसेच उंब्रजमध्येही मतदान आहे़ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीवेळी हे मतदार उंब्रजमध्ये मतदान करतात; पण विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीवेळी ते आपल्या गावी मतदान करण्यासाठी इच्छुक असतात़ आजही याचा प्रत्यय आला. सकाळपासून पाटण तालुक्यातील दोन्ही गटांतील कार्यकर्ते उंब्रजमधील अशा मतदारांच्या घरासमोर गाड्या घेऊन उभे राहिलेले दिसत होते़ मतदारांना घेऊन या गाड्या तारळे भागात जात होत्या. संबंधित मतदारांना आपापल्या गावी नेण्यात आल्यामुळे
मतदार निवांत, कार्यकर्त्यांची धावपळ
कोपर्डे हवेली, नडशी, शिरवडे, पार्ले आदी ठिकाणी मतदानाचा वेग सकाळपासून चांगला होता़ दुपारीही लोक मतदान करण्यासाठी येत होते़ सायंकाळी पाच वाजेपर्यंत मतदान पूर्ण होत आले होते़ मात्र, तरीही ज्यांचे मतदान राहिले आहे, अशा मतदारांचा शोध सर्वच पक्षांचे कार्यकर्ते घेत होते़ मतदारांना आणण्यासाठी कार्यकर्त्यांची धावपळ सुरू असल्याचे दिसून येत होते. काही ठिकाणी मतदारांच्या दिमतीसाठी चारचाकी गाड्यांची सोयही पाहायला मिळाली. उंब्रजमधील मतदानाची टक्केवारी मात्र घसरली.
भगतवाडी ग्रामस्थांचा बहिष्कार
चाफळ : कऱ्हाड उत्तर मतदार संघातील भगतवाडी-पाल गावाने रस्त्याच्या प्रश्नावरून दुपारपर्यंत मतदानावर बहिष्कार घातला. याठिकाणी २२० मतदार आहेत. पाल गावापासून सात किलोमीटर अंतरावर हे गाव असून, या गावाला अद्यापही पक्का रस्ता नाही. ग्रामस्थांनी वेळोवेळी लोकप्रतिनिधिंंकडे रस्त्यासाठी पाठपुरावा केला. मात्र, रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला नाही. त्यामुळे या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत घेण्यात आला होता. आज सकाळी ग्रामस्थ मतदान करायला येत नसल्याचे अधिकाऱ्यांच्या लक्षात आल्यावर झोनल आॅफिसर खामकर यांनी माहिती घेतली असता, ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार घातल्याचे त्यांना समजले. त्यामुळे खामकर यांनी याबाबतची माहिती तहसीलदार व जिल्हाधिकाऱ्यांना दिली. जिल्हाधिकाऱ्यांनी दूरध्वनीवरून भगतवाडीच्या सरपंचांसह ग्रामस्थांशी संपर्क साधून मतदान करण्याबाबत आवाहन केले. रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनी दिल्यानंतर दुपारी दोननंतर ग्रामस्थांनी मतदानाचा हक्क बजावला.
दुष्काळी शामगाव भागात मतदानाचा सुकाळ
शामगाव परिसरातील अंतवडी, रिसवड, सुर्ली, कामथी, वाघेरी, मेरवेवाडी, पाचुंद ही गावे दुष्काळी समजली जातात. संबंधित गावांचा पाणीप्रश्न गत अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. असे असताना विधानसभा निवडणुकीत मात्र याठिकाणी उत्स्फूर्त मतदान झाले. या भागातून सुमारे ७० टक्के मतदान झाले. गत निवडणुकीपेक्षाही मतदानाची ही टक्केवारी समाधानकारक आहे.
मतदान मशीनची ‘बीप’ थांबेना
कोपर्डे हवेली येथील एका मतदान केंद्रावर मतदाराने मशीनचे बटण दाबल्यानंतर मशीनचा आवाज बंद होईना. बटण दाबल्याची बीप बराच वेळ सुरू होती. या प्रकारामुळे रांगेत थांबलेल्या मतदारांमध्ये हशा पिकला. अधिकाऱ्यांनी मशीनची पाहणी केली. अडकलेले बटण त्यांनी पुन्हा दाबले. बटण निघाल्यानंतर आवाज बंद झाला व पुन्हा मतदानास सुरुवात करण्यात आली़ त्यानंतर सुरळीत मतदान पार पडले.