सीईओंच्या सहीत तिन्ही भाषांचा संगम...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:28 IST2021-06-06T04:28:27+5:302021-06-06T04:28:27+5:30
शालेय जीवनापासूनच सहीला सुरुवात होते. ही सहीच पुढे आपली ओळख बनते. सही साधी असली तरी ती दुसऱ्याला हुबेहूब करता ...

सीईओंच्या सहीत तिन्ही भाषांचा संगम...
शालेय जीवनापासूनच सहीला सुरुवात होते. ही सहीच पुढे आपली ओळख बनते. सही साधी असली तरी ती दुसऱ्याला हुबेहूब करता येत नाही. अनेकांच्या सहीवर कुटुंबीयांचा प्रभाव असतो. तर काहीजण मित्रांबरोबर चर्चा करूनही सही कशी असावी, याचे प्रात्यक्षिक करतात. त्यात काय असावे, याची चर्चा होऊन सही गिरवली जाते. काहीजणांच्या सहीवर परिस्थितीचाही प्रभाव राहतो. बहुतांशी सहीत आडनाव लांब असते. विशेष म्हणजे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्या सहीत मराठी, कन्नड आणि इंग्रजी या भाषांचा संगम पाहायला मिळतो.
पूर्वीच्या काळी हाताचा अंगठा महत्त्वाचा समजला जायचा. कोणतेही शासकीय काम करण्यास गेले की निरक्षर लोक डावा हात पुढे करून शाईमध्ये अंगठा बुडवून तो कागदावर उठवत. आता अंगठा उठविणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. प्रत्येक घरात सुशिक्षित पिढी आहे. त्यामुळे मुले शाळेत जातात. दुसरी, चौथीपर्यंत शाळा शिकली तरी भाषा ज्ञान आलेले असते. त्यामुळे इंग्रजी नसली तरी मराठीत का असेना मोडकी तोडकी सही करता येते.
सही कशी असावी, याबाबत काही नियम नाही. कोणीही कशाही पद्धतीने ती करू शकतो. कोणाची मातृभाषेत असते तर कोणी इंग्रजीत करतो. पण, बहुतांशीजण हे इंग्रजीमध्येच सही करतात. यामध्ये आपल्या नावातील पाहिले स्पेलिंग घेतात. नंतर वडिलांच्या नावातील पाहिले स्पेलिंग असते. त्यानंतर आडनाव संपूर्ण लिहितात. यामध्ये आडनावच लांब राहते.
सहीची खरी सुरुवात शाळेपासून सुरू होते, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. अशावेळी काही मित्र एकत्र येऊन आपल्या सहीत काय काय असावे. त्यामध्ये काय दिसावे, अशी चर्चा करतात. त्यानंतर सही आकार घेते तर काहीजण घरातील लोकांची सही पाहतात. त्याप्रकारे ती करण्याचा प्रयत्न करतात. तसेच काहीवेळा पालकही मुलांना सही कशी असावी व करावी, याबद्दल मार्गदर्शन करतात. कधी शिक्षकही मुलांना सहीबद्दल माहिती देतात. त्यामुळे अनेकांच्या सहीवर मित्र, कुटुंबीय, शिक्षकांचा प्रभाव राहतो. मात्र, अनेकांच्या सहीवर परिस्थितीचा प्रभाव असतो, असेही सांगण्यात येते.
काहीजणांची सही साधी असते. घरातील लोक साधे, कष्टाळू असतात. परिस्थिती सामान्य असते. त्याचा परिणाम म्हणून अनेकांची सही एकदम साधी असते तसेच सहीप्रमाणे संबंधितांचा स्वभावही साधाच पाहायला मिळतो. अशी ही सहीच सर्वांची आयुष्यभराची ओळख बनून जाते.
चौकट :
सहीमध्ये गावाच्या नावाचे स्पेलिंग...
सही सुरुवातीला केली जाते तीच शेवटपर्यंत अनेकांची राहते. पण, काहीजण त्यामध्ये बदलही करतात. अधिक करून मुलींच्या सहीत बदल होतो. लग्नानंतर सहीत बदल केला जातो. तर काही पुरुषही सहीमध्ये बदल करतात. सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांची पाच वर्षांपूर्वीपर्यंत सही वेगळी होती. त्यानंतर त्यांनी सहीत बदल केला. त्यांच्या सहीवर आई - वडिलांचा प्रभाव आहे. वडील कर्नाटक शासन सेवेत तर आई बँकेत होती. घरातील प्रभावात त्यांनी सहीला सुरुवात केली. आता त्यांच्या सहीत मराठी, कन्नड आणि इंग्रजी भाषा आहे. तसेच एका इंग्रजी स्पेलिंगमधून गावाचे नावही ते दर्शवितात.
सहीचा फोटो आहे... दिनांक ०५ सातारा सीईओ सही नावाने मेल आणि कोष्टी सर मोबाईलवर...
- नितीन काळेल