सातारा/कऱ्हाड : जिल्ह्यात जीबीएस रुग्णांची स्थिती नियंत्रणात असून, आतापर्यंत सहा जण समोर आलेले आहेत. त्यातील तिघांना उपचारानंतर बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहे. तर तिघांवर सध्या उपचार सुरू आहेत. त्याचबरोबर जीबीएस आजाराच्या पार्श्वभूमीवर कऱ्हाडच्या उपजिल्हा रुग्णालयात सोयींनी युक्त आठ खाटा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत.जिल्ह्यात गुरुवारी (दि. ३०) प्रथम जीबीएस आजाराचे चार रुग्ण स्पष्ट झाले. यामुळे प्रशासन तसेच आरोग्य विभागानेही सतर्कता बाळगत विविध उपाययोजना सुरू केल्या. सर्व्हेही सुरू केला. पण, आतापर्यंत जिल्ह्यात सहाच रुग्ण स्पष्ट झाले आहेत. सध्या जीबीएसच्या तीन रुग्णांवरच उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृतीही चांगली आहे.
जीबीएस आजाराच्या पार्श्वभूमीवर कऱ्हाडच्या वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात सोयींनी युक्त अशा आठ खाटा राखीव ठेवल्या आहेत. तसेच रुग्णावर उपचार जलद होण्यासाठी कृष्णा वैद्यकीय महाविद्यालयात पदव्युत्तर शिक्षण घेणारे २२ प्रशिक्षणार्थी डॉक्टरांचे पथक पाठविण्यात येणार आहे, अशी माहिती आमदार डॉ. अतुल भोसले यांनी दिली आहे.
अतुल भोसले यांच्याकडून आढावाकऱ्हाडच्या शासकीय विश्रामगृहात ‘जीबीएस’च्या पार्श्वभूमीवर आमदार डॉ. अतुल भोसले यांनी वैद्यकीय विभागातील अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, तहसीलदार कल्पना ढवळे, गटविकास अधिकारी प्रताप पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. नरेंद्र माळी उपस्थित होते. यावेळी आमदार डाॅ. भोसले यांनी कऱ्हाडमधील उपजिल्हा रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रात स्वच्छता चांगली होणे, स्वच्छ पाणी मिळण्यासाठी स्वच्छता मशीन व वॉटर प्युरिफायर देण्यासाठी पुढाकार घेऊ, अशी ग्वाही दिली.